सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी; वस्तीत पाणी शिरले, महामार्ग वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:03 PM2019-11-02T19:03:07+5:302019-11-02T19:06:54+5:30
एकाच दिवसात तब्बल 633 मिलिमीटर पाऊस
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात पावसाने कहर केला आहे.शुक्रवारी रात्री सर्व 8 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. एकाच दिवसात तब्बल 633 मिलिमीटर पाऊस पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. शेत जमिनी पाण्यात बुडाल्या आहेत, शेतातील काही पिके वाहून गेली, अनेक पाझर तलाव, माती नाला बांध वाहून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील नलकांडी पूल वरील रस्ता बनकीन्होळ्याजवळ वाहून गेला यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील खेळणा, पूर्णा, पालोद, अजिंठा येथील वाघूर नदीला महापूर आला आहे.अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे.
याशिवाय अंधारी-भराडी- म्हसला, अनवी राहिमाबाद, रस्त्यावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे वाहन धारक व प्रवाशांचे हाल होत आहे. परदेशी वाडी व के- हाळा गावाचा पुरा मुळे संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात यामुळे पाणी आले आहे सलग 14 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतातील पिके आता सडू लागली आहेत. मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरीला कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकरी हताश आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी गावागावात जाऊन नुकसानीची माहिती घेतली व शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
यासोबतच वांगी बुद्रुक येथे पूल वाहून गेल्याने, नदीचे पाणी गावात शिरले यामुळे एकूण 58 घरांची पडझड झाली आहे. शेती पाण्यात बुडाली, लोक उघड्यावर आले आहे, अशी भीषण अतिवृष्टी आम्ही कधी पाहिली नाही अशी माहिती सरपंच महेश पाटील, चंदू साळवे यांनी दिली.
8 मंडळात अतिवृष्टी...
सिल्लोड 67 मिलिमीटर, भराडी 95, अंभई 69 ,
अजिंठा 72, गोळेगाव 68,आमठाणा 68, निल्लोड 100,
बोरगाव बाजार 84 , एकूण 623
आता पर्यंत तालुक्यात एकूण 1098.51 मिलिमीटर पाऊस झाला आहे.