बेसुमार वाळू उपसा सुरूच
By Admin | Published: August 24, 2014 01:03 AM2014-08-24T01:03:31+5:302014-08-24T01:14:50+5:30
औंढा नागनाथ : पूर्णा नदी घाटावर परवाना नसतानादेखील अवैधपणे यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा होत आहे.
औंढा नागनाथ : शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना मूठमाती देत पूर्णा नदीवरील पोटा, अंजनवाडी वाळू घाटावर गौण खनिजाचे उत्खनन करण्याचा परवाना नसतानादेखील अवैधपणे यंत्राच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा होत आहे.
नियमांचा बोजवारा उडविणाऱ्या माफियांना प्रशासनाकडूनच पाठबळ मिळत असल्याने मुदत संपूनही वाळू उपसा सुरूच ठेवण्यात आलेला आहे. ‘लोकमत’ ने याबाबत स्टिंग आॅपरेशन करून वाळूचा गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीस आणले होते; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तितक्या गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. औंढा तालुक्यामध्ये पूर, जडगाव, सिद्धनाथ गांगलवाडी व पूर्णा नदीवरील चिमेगाव, भगवा, पोटा, अनखळी, अंजनवाडी, पेरजाबाद, नालेगाव या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव झाला आहे. आजपर्यंत येथून हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात आला. एकाच धक्क्यावर पश्चिम महाराष्ट्र पॅटर्ननुसार बोटींग, जेसीबी सक्शन पंपाच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूंचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. मराठवाड्यात अशा पद्धतीने वाळूउपसा करण्याची कुठेच परवानगी दिलेली नाही. समुद्र किनारपट्ट्यांवर पाण्याची खोली जास्त असलेल्या ठिकाणीच अशा प्रकारची परवानगी प्रशासनाकडून देण्यात येत असते. अशी परवानगी नसताना वाळू माफियांकडून नदीच्या पात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे केल्या जात आहेत. त्यामुळे नदीच्या मूळ नैसर्गिक पात्राच्या आकारामध्ये भविष्यामध्ये बदल घडून नदीकाठची गावे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)