‘एक्साईज अपील’ औरंगाबादेतच ठेवा!
By Admin | Published: August 27, 2014 12:39 AM2014-08-27T00:39:56+5:302014-08-27T00:40:27+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली.
औरंगाबाद : केंद्र शासनाने औरंगाबादेतील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच उद्योगजगतात एकच खळबळ उडाली. उद्योजकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी दर्शवत ‘अपील’ कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी केली.
दहा वर्षांपूर्वी सीएमआयएचे तत्कालीन अध्यक्ष उल्हास गवळी व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय औरंगाबादेत आणले होते.
मागील दहा वर्षांपासून या कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू असताना केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१३ मध्ये संपूर्ण अपील आयुक्तालय नागपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथीलही अपील कार्यालय नागपूरला नेण्यात आले.
मराठवाड्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने सविस्तर प्रकाश टाकला होता. त्यानंतर उद्योजकांसह सेवाकर भरणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील हजारो सेवाकरदात्यांना अपिलासाठी नागपूर कार्यालय गाठावे लागणार आहे.
सेवाकर ज्याला अमान्य असेल किंवा जास्त असल्यास त्याला अपील करण्याची संधी असते. पूर्वी मराठवाड्यातील सेवाकरदात्यांना अपिलासाठी मुंबईला जावे लागत होते. हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे. हे कार्यालय औरंगाबादेतच ठेवण्याची मागणी उद्योग वर्तुळातून होत आहे.