नगररोडजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:02 AM2021-07-15T04:02:56+5:302021-07-15T04:02:56+5:30
खुन की अपघात गुढ कायम:मयत महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा खून की अपघात?: मृतदेहाचे डोके व हातावर जखमा वाळूज ...
खुन की अपघात गुढ कायम:मयत महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा
खून की अपघात?: मृतदेहाचे डोके व हातावर जखमा
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील वळदगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर बुधवारी (दि. १४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. या मृतदेहाचे डोके व हातावर जखमा असून रक्तस्राववही झालेला असल्याने हा खून की अपघात याचे गूढ आहे.
वळदगाव शिवारातील सर्व्हिस रोडजवळ वाहनतळ असून तेथे मोठ्या संख्येने जडवाहने थांबलेली असतात. पंढरपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नानासाहेब रहाटे, सुरज देवरे, ओमकार काळे हे पहाटे माॅर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना महिला रस्त्याच्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याला माहिती दिली. उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोहेकॉ. मोहन पाटील, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. सुमेध जाधव यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. ही घटना सातारा ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सातारा पोलिसांना कळवण्यात आले. सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी गोरे, कर्मचारी केशव बारगजे, वळदगावचे पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, पाटोद्याचे लहू मुचक आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.
मृत महिलेचे वर्णन
मृताचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असून रंग गोरा आहे. लालसर रंगाची साडी व निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे.
चेहरा पदराने झाकला
मृतदेह साडीच्या पदराने झाकलेला होता. या सर्व्हिस रोडवर वाहनतळ असल्याने चालक व क्लीनरची गर्दी असते. सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले की, मयत अनोळखी महिला वेडसर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या महिलेला वाहनचालक व क्लीनर जेवणही देत असल्याने घातपाताची शक्यता दिसत नाही. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
फोटो ओळ- वळदगाव शिवारातील सर्व्हिस रोडवर अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आल्याने घटनास्थळाची पाहणी करताना एमआयडीसी व सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी.
फोटो क्रमांक-स्पॉट फोटो १/२/३/४
--------------------