वाळूज महानगरमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळ्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 PM2021-07-14T16:15:37+5:302021-07-14T16:18:06+5:30
Death Body found in Waluj Area : महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा झालेल्या असून मोठा रक्तस्त्रावही दिसून येत आहे
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औरंगाबाद-नगर महामार्गावरील वळदगाव शिवारातील सर्व्हीस रोडवर आज बुधवार (दि.१४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळयाने खळबळ उडाली आहे. या मयत अनोळखी महिलेच्या डोके व हाताजवळ जखमा झालेल्या असून मोठा रक्तस्त्रावही दिसून आल्याने महिलेचा खून झाला की अपघात या विषयी गुढ कायम आहे. ( Excitement over finding the body of an unidentified woman in Waluj )
या विषयी अधिक माहिती अशी की, नगररोडलगत वळदगाव शिवारात सिडकोच्यावतीने सर्व्हीसरोड करण्यात आला आहे. या सर्व्हीसरोडजवळ वाहनतळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जडवाहने थांबलेली असतात. या सर्व्हीसरोडवरुन बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पंढरपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नानासाहेब रहाटे, सुरज देवरे, ओमकार काळे आदी मार्निंग वॉकसाठी जात असतांना त्यांना एक अनोळखी महिला रस्त्याच्याकडेला रक्तांच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. यानंतर नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, पोहेकॉ. मोहन पाटील १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.सुमेध जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, ही घटना सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या प्रकाराची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. यानंतर सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संभाजी गोरे, पोलिस कर्मचारी केशव बारगजे, वळदगावचे पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, पाटोद्याचे लहु मुचक आदींनी घटनास्थळ गाठुन या अनोळखी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवुन दिला.
खुन की अपघात गुढ कायम
मयत अनोळखी महिलेच्या डोक्याजवळ खोल जखम झालेले असून हाताच्या कोपराजवळ जखम झालेली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असून रंग गोरा आहे. या महिलेने लालसर रंगाची साडी व निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलाला आहे. घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव झालेला असल्याने या महिलेचा अज्ञात मारकऱ्याने खुन केला की वाहनाच्या धडकेने तिचा मृत्यू झाला याविषयी गुढ कायम आहे.
मयत महिलेचा चेहरा पदराने झाकला
या मयत अनोळखी महिलेचा मृतदेह साडीच्या पदराने झाकलेला होता. या सर्व्हीसरोडवर वाहनतळ असल्याने चालक व क्लिनरची गर्दी असते. या विषयी सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्याशी संपर्क साधता असता मयत अनोळखी महिला वेडसर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या वेडसर महिलेला वाहनचालक व क्लिनर जेवणही देत असल्याने घातपाताची शक्यता नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.