खळबळजनक ! दुकान फोडीच्या तपासातून सापडला १२६ डिटोनेटर्सचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 12:28 PM2021-08-18T12:28:43+5:302021-08-18T12:31:50+5:30
पैठण रोडवरील गेवराई येथील किराणा दुकान फोडून माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती.
औरंगाबाद : पैठण रोडवरील गेवराई येथील दुकान फोडल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका घरावर टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर्स स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकासह तिकडे धाव घेतली. संशयित आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
जितेंद्र ऊर्फ जितूसिंग संतोषसिंग टाक (रा. अलाना कंपनीसमोर, गेवराई), असे आरोपीचे नाव आहे. पैठण रोडवरील गेवराई येथील किराणा दुकान फोडून माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती. त्यामुळे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि अन्य अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारी घटनास्थळी गेले होते.
दुकानात चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी त्यातील एक आरोपी जितूसिंग टाक असल्याचे ओळखले. टाक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहे. तो अलाना कंपनी परिसरातच राहतो. पोलिसांनी लगेच त्याचे घर गाठले, पण तो घरी नव्हता. पथकाने त्याच्या घरात चोरीचा माल मिळतो, का हे पाहण्यासाठी घर झडती घेण्यास सुरुवात केली. झडतीत तेथे १२६ डिटोनेटर्स (स्फोटके) आणि वायर, कैची, चिमटा, स्क्रू ड्रायवर आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने डिटोनेटर्स आढळल्याने खळबळ उडाली.
या घटनेची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना पोलिसांनी कळविली. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बीडीडीएस पथकाच्या निगराणीखाली ही स्फोटके जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी जितूसिंगच्या विरोधात अवैध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला.
बीडीडीएसने काढला परिसर पिंजून
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर श्वान आणि स्फोटक शोधक यंत्रामार्फत परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, अन्य ठिकाणी कोणतेही स्फोटक वस्तू आढळली नाही.
संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके
संशयित आरोपीने ही स्फोटके कोणाकडून मिळविली आणि कोठून आणली याबाबतचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि चिकलठाणा पोलिसांना दिले.