खळबळजनक ! किरकोळ कारणावरून मध्यरात्री तरुणाचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:15 PM2021-01-15T12:15:54+5:302021-01-15T12:16:07+5:30
crime news पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील पिया मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
समीर खान सिकंदर खान (२७, रा. असेफिया कॉलनी), असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, असेफिया कॉलनी येथील समीरचा गांजा विकण्याचा पिढीजात धंदा आहे. गुरुवारी मध्यरात्री समीर आपला मित्र आदिलसोबत पिया मार्केट येथील ओम साई लीला या बीअर बारमधून पार्सल आणण्यासाठी गेला होता. पार्सल घेऊन परत निघत असताना बारसमोरील वडाच्या झाडाजवळ त्याची तीन तरुणांसोबत किरकोळ बाचाबाची झाली. समीरचा मित्र यावेळी मदतीला धावून आला. त्याने दोघांना मारहाण केली. एका तरुणाने समीरच्या मांडीत धारदार शस्त्राने घाव केले. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. गुप्तांगाजवळ खोलपर्यंत जखम झाल्याने समीर कोसळला. प्रचंड रक्तस्राव सुरू होता. मोमीन खान आमीर खान, समीर खान बाबर खान या दोघांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी समीरला तपासून मृत घोषित केले. समीरचा खून झाल्याची वार्ता मध्यरात्री शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याची संपूर्ण यंत्रणा दाखल झाली. रात्री उशिरा सिटीचौक पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.
‘ते’ तीन आरोपी कोण?
समीरची हत्या करणारे तीन आरोपी कोण, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. भांडण जेव्हा झाले तेव्हा त्याच्यासोबत असलेला आदिल याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. समीरच्या वसाहतीत तणावपूर्ण शांतता होती. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल होत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संशयित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे.