जेवणावर बहिष्कार; विद्यार्थ्यांनी घेतले कोंडून
By Admin | Published: August 24, 2014 11:46 PM2014-08-24T23:46:05+5:302014-08-24T23:54:57+5:30
वसमत : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६० विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून जेवण बंद आंदोलन सुरू करून एकच खळबळ उडवून दिली.
वसमत : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६० विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून जेवण बंद आंदोलन सुरू करून एकच खळबळ उडवून दिली. निकृष्ट दर्जाचे जेवण व प्राचार्य-शिक्षकांकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रविवारी स्वत:ला कोंडून घेतले होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी हे आंदोलन मिटले.
विद्यालयातील मेसमधील निकृष्ट जेवणाबद्दल विद्यार्थ्यांनी अनेकदा प्राचार्यांकडे तक्रारही केली; परंतु परिस्थिती सुधारण्याऐवजी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थ्यांकडून बाथरूम स्वच्छता करून घेणे, परिसरातील कचरा व गवत साफ करून घेणे आदी कामे करून घेण्यात येत असल्याचीही तक्रार विद्यार्थ्यांची आहे. रविवारी पालक भेटीचा दिवस असल्याने पालक नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना भेटावयास आले असता विद्यार्थी जेवत नसल्याचे निदर्शनास आले. इयत्ता आठवी, नववी, दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकून आपापल्या सदनमध्ये स्वत:ला कोंडून घेतले व खोल्यांची दारे आतून लावून घेतली. विद्यार्थ्यांच्या या पवित्र्याने नवोदयचे शिक्षक व मेसमधील कर्मचारी चांगलेच हादरले. पालकांच्या समक्षच हा प्रकार सुरू होता. शिक्षक पालक व विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते. मात्र जिल्हाधिकारी आल्याशिवाय बाहेर येणार नाही, असा एकच घोषा विद्यार्थ्यांनी लावला होता. हा प्रकार समजल्याने उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार अरविंद नरसीकर हे ‘नवोदय’मध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली व नवोदयच्या मेसची पाहणी केली असता तक्रारीत सत्यांश असल्याचे आढळले. याची गंभीर दखल घेण्यात येईल व यापुढे प्रकार होणार नाही, झाल्यास कारवाई होईल, असे आश्वासन तहसीलदार नरसीकर यांनी विद्यार्थ्यांना दिल्याने सायंकाळी सहा वाजता विद्यार्थी स्वयंकैदेतून बाहेर आले व तिढा सुटला. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळाल्याने माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, सुनील काळे, नवीनकुमार चौकडा आदींनी ‘नवोदय’ला भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)