थ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडवणारा अडकला; महागड्या दारू, सिगारेटचा आस्वाद घेऊन व्हायचा फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:15 PM2021-06-10T12:15:07+5:302021-06-10T12:19:14+5:30
ठकसेनाला वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
औरंगाबाद : महागड्या हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेण्याच्या बहाण्याने थांबून गंडा घालणाऱ्या एकाला वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भीमसेंट जॉन असे ताब्यात घेतलेल्या ठकबाजाचे नाव आहे.
ही व्यक्ती किज हॉटेल येथे दोन दिवसांपासून थांबली असून, तिच्या हालचाली संशयास्पद दिसत असल्याने हॉटेल मालक चौधरी यांनी वेदांतनगर ठाण्यात माहिती दिली. पाळत ठेवून माहिती घेतली असता त्याच्यावर पोलीस स्टेशन कफपरेड, मनिपाल, धारवाड, ओल्ड गोवा, येथे हाॅटेलमध्ये थांबून महागडी दारू, सिगारेट व इतर पदार्थ ऑर्डर करणे व बिल न देता, रूम चेक आऊट न करताच फरार होणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने याच प्रकारे औरंगाबादेतही वेगवेगळ्या नावाने हॉटेल रामा इंटरनॅशनल, ॲम्बेसिडर या हॉटेलला फसविल्याचे समोर आले.
आकर्षक व्याजाचे आमिष देऊन १ कोटीची फसवणूक; आरोपीस पुण्यात केली अटक
किज् हाॅटेल येथेही विश्वास बसावा म्हणून त्याने ॲग्रिकल्चर कॉन्फरन्स असल्याचे सांगितले व डिपॉझिट दिले नाही, तसेच रूममध्ये राहून महागड्या २० ते २५ सिगारेट मागविल्या. महागडी दारू मागविली असता त्याचा संशय आला. त्यानंतर त्याला डिपाॅझिट जमा करण्यास सांगितले, त्यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे व्यवस्थापकाला अधिक संशय आला.
आधारकार्डने संशयाला मिळाला दुजोरा...
आधारकार्ड इंटरनेटवर चेक केल्यानंतर संशयास पुष्टी मिळाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. या प्रकरणात आरोपीने ६ ते ७ वेगवेगळी नावे वापरून अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला ताब्यात घेतले
थ्री स्टार, फाइव्ह स्टार, हाॅटेल्सना गंडा घालणाऱ्या ठगास वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. २०१०, १२ साली हाॅटेल रामा इंटरनॅशनल, लेमन ट्री, अजंटा ॲम्बेसिडरला गंडविले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे अधिक तपास करीत आहेत.