अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:46+5:302021-03-14T04:05:46+5:30
औरंगाबाद : शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी विभागीय आयुक्त ...
औरंगाबाद : शहरातील अभ्यासिकांना ‘लॉकडाऊन’मधून सूट द्यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे केली आहे.
शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान अंशत: लॉकडाऊन घोषित केला असून शनिवार व रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन राहणार आहे. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने २१ मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा, २७ मार्च रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा, ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा आयोजित केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहरात राहत असून ते अभ्यासिकांमध्ये अभ्यास करीत आहेत.
येणारे आठ-पंधरा दिवस हे या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगोदरच औरंगाबाद शहरातील अभ्यासिका या ५० टक्के उपस्थितीत सुरू आहेत. त्यात प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या अभ्यासिका आता सोमवार ते शुक्रवार रात्री नऊपर्यंत, तर शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद राहाणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता, कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून शहरातील अभ्यासिका सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आ. चव्हाण यांनी केली आहे.