आदेशाची पूर्तता केल्यास शिक्षेतून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:03 AM2021-09-19T04:03:57+5:302021-09-19T04:03:57+5:30
औरंगाबाद : वारंवार संधी देऊनही हेतुपुरस्सर आदेशाचे पालन न केलेले गौतम पाखरे आणि नागेश पाखरे यांनी औरंगाबाद जिल्हा ग्राहक ...
औरंगाबाद : वारंवार संधी देऊनही हेतुपुरस्सर आदेशाचे पालन न केलेले गौतम पाखरे आणि नागेश पाखरे यांनी औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेल्या आदेशाची पूर्तता न केल्यास त्यांना प्रत्येकी एक वर्ष तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा मंचाच्या अध्यक्ष स्मिता कुलकर्णी आणि सदस्या संध्या बारलिंगे व किरण आर. ठोले यांनी सुनावली. मात्र, कारावासाच्या मुदतीच्या आत त्यांनी आदेशाची पूर्तता केल्यास त्यांची सुटका करण्याचे मंचाने आदेशात म्हटले आहे.
तिसगाव येथील मनिष राजपूत यांनी गौतम पाखरे आणि नागेश पाखरे यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. सुनावणीअंती तक्रारदार राजपूत यांना पाखरे यांनी एक लाख २० हजार आणि ५० हजार रुपये १२ टक्के व्याजासह देण्याचे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची पूर्तता एका महिन्यात करावयाची होती; परंतु आरोपींनी आदेशाची पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार राजपूत यांनी १० ऑगस्ट २०१८ रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी अर्ज दाखल केला होता. संधी देऊनही मंचासमोर आरोपी हजर राहत नव्हते. त्यांना जामीनपात्र आणि अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तडजोडीचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही तडजोड केली नाही. उलट आरोपींनी तक्रारकर्त्याला प्रकरण मागे घेण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपींना मंचासमोर हजर करण्यात आले. मंचाने वारंवार संधी देऊनही आरोपी हेतुपुरस्सर आदेशाचे पालन करत नसल्याचे स्पष्ट झाल्याने मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला.