तीन ग्रामपंचायतींचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Published: November 7, 2014 12:38 AM2014-11-07T00:38:11+5:302014-11-07T00:41:52+5:30
कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील
कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील ३७ सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. यामध्ये अकरा ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश असून, तीन ग्रामपंचायतीचे तर जवळपास संपूर्ण बोर्डच अपात्र ठरल्याने या ग्रामपंचायतीच्या बोर्डांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१), (ज ५) नुसार मुदतीत शौचालय बांधून त्याचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना पदावर अनर्ह (अपात्र) ठरविण्याची तरतूद आहे. याच अधिनियमातील कलम १६ नुसार कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. कळंब तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये ७६७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर १० जानेवारी २०११ ते १० जानेवारी २०१२ या दरम्यान सर्व सदस्यांनी आपल्या शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. या कालावधीत असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधीही देण्यात आली होती. याउपरही प्रमाणपत्र व ठराव सादर केले नसल्याने ३७ सदस्यांवर अनर्हतेची कारवाई अपर जिल्हाधिकारी जोतीबा पाटील यांनी केली आहे. यात एकूण ११ ग्रामपंचायतीतील सदस्यांचा समावेश असून, यातही कोठाळवाडी व शिंगोलीतील सर्व तर आडसूळवाडी येथील सातपैकी सहा आणि वाकडी येथील सात पैकी चार सदस्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे असतित्व
धोक्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत काही सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे. (वार्ताहर)