कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ
By Admin | Published: January 2, 2015 12:38 AM2015-01-02T00:38:38+5:302015-01-02T00:51:13+5:30
औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.
औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे. शासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांचे वीज बिल माफ केलेले आहे.
कृषी संजीवनी योजना २०१४ अंतर्गत शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या कृषिपंपाच्या एकूण मूळ थकबाकी बिलापैकी ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास बाकी ५० टक्के मूळ रक्कम शासन महावितरणकडे जमा करते. ३१ मार्च २०१४ पर्यंतचे कृषिपंपाचे व्याज आणि दंड महावितरण ग्राहकांला माफ करते. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के फायदा मिळतो. योजनेला शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महावितरणने कळविले आहे. महावितरणचे औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांच्या बिलापोटी शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपये थकले आहेत. झोनमध्ये कृषिपंपांची संख्या ३०७२१५ आहे. या कृषिपंपधारकांकडे १ हजार ४५४ कोटी ४९ लाख ३१ हजार वीज बिल थकले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २०२४३६ कृषिपंंपधारकांकडे ८३१२९.८६ लाख रुपये थकले आहेत. जालना जिल्ह्यात १०४७७९ कृषिपंपधारकांकडे ६२३१९.४५ लाख रुपये थकले आहेत. योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला नसल्यामुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.