नवप्रकाश योजनेला मुदतवाढ
By Admin | Published: June 24, 2017 11:38 PM2017-06-24T23:38:04+5:302017-06-24T23:40:29+5:30
परभणी : वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरु असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.
महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांना विजेपोटी दर महिन्याला वीजबिल दिले जाते. परंतु, जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून बिलाचा वेळेवर न भरणा करणाऱ्या ग्राहकांची वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर जवळपास ५०० कोटीपर्यंत गेला आहे. त्यामुळे हा थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पासून नवप्रकाश योजना राबविण्यात आली. या योजनेचा कालावधी संपल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ लागली.
त्यामुळे महावितरणने पुन्हा या योजनेला आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, री कनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सुट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञा पत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास ७८ हजार ग्राहक येतात. या ग्राहकांकडे ९६ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.