साडेतीन कोटीतून ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण
By Admin | Published: August 11, 2014 12:41 AM2014-08-11T00:41:16+5:302014-08-11T01:52:12+5:30
औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या.
औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च करून औसा, किल्लारी आणि कासारशिरसी या तीन ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्यात आले. आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठीही जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या औसा तालुक्यातील रुग्णांना आता अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत़
औसा मतदारसंघातील औसा, किल्लारी आणि कासारशिरसी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तर औसा तालुक्यात सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. औसा आणि किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची संख्या कमी असल्याने गंभीर आजारी रुग्णांना लातूरला पाठविण्यात येत होते. पण आता या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे़ लवकरच श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औसा आणि किल्लारी या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ कोटी २२ लाख रुपये खर्चून विस्तारीकरण करण्यात आले आहे तर कासारशिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात १ कोटी ३५ लाखांची विविध कामे करण्यात आली.
औसा येथील नागरी दवाखान्याचे स्थलांतर आलमला येथे करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. रामलिंग मुदगड येथेही प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. बेलकुंडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी ३० लाख ७० हजार, हासेगावला ४५ लाख ५० हजार, जवळगा (पोमादेवी) ला ३२ लाख २५ हजार, लामजना येथे ५६ लाख ५१ हजार, मातोळा येथे २८ लाख ३१ हजार, उजनी येथे ३३ लाख ३६ हजार असा खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. रुग्णालयांच्या विस्तारीकरणामुळे सामान्य रुग्णांना मोठा लाभ होणार आहे़
आमदार बसवराज पाटील म्हणाले की, आज शहरी भागात मोठ-मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. मोठ्या व खाजगी रुग्णालयात जसे उपचार मिळतात, तसे उपचार शासकीय रुग्णालयात मिळावेत म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवाही महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.