नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:39 PM2019-07-03T23:39:53+5:302019-07-03T23:40:12+5:30
मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून किमान यंदा तरी काही पदरी पडेल आणि प्रकल्पांना आर्थिक तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रलंबित आणि रखडलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागणार का? याकडेच उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत आहे. आजघडीला एकेरी रेल्वे मार्गामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून परभणी-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी होत आहे; परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार असल्याची परिस्थिती आहे.
प्रस्तावित दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग आणि रोटेगाव - कोपरगाव रेल्वे मार्गही रेंगाळला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीसगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. तसेच शिर्डी येथे जाणाºया भाविकांसाठी तसेच दक्षिण भारतात थेट गोवा येथे जाण्यासाठी रोटेगाव-कोपरगाव हा प्रस्तावित रेल्वे मार्ग फायदेशीर ठरणारा आहे. या मार्गांसंदर्भात काहीतरी अर्थसंकल्पात असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या रेल्वे सुरूहोण्यासह रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पीटलाईन महत्त्वाची ठरते. त्यामुळे नव्या रेल्वेची मागणी करणाºया मराठवाड्यातील विशेषत: औरंगाबादच्या रेल्वे प्रवाशांवर ‘पीटलाईन’च्या नावाखाली वर्षानुवर्षे अन्याय होत असल्याचे दिसते. त्यामुळे पीटलाईन करण्याची मागणी होत आहे.
नव्या रेल्वेगाड्या मिळाव्यात
मुंबई, दिल्लीसह बंगळुरूसाठी नवीन रेल्वे मिळाली पाहिजे. मनमाड-परभणी मार्गाचेही दुहेरीकरण मार्गी लागण्याची गरज आहे. औरंगाबादला पीटलाईन झाली तर किमान चार नव्या रेल्वे सुरूहोऊ शकतात. अर्थसंकल्पातून नेमके काय मिळते, हे पाहावे लागेल.
- भावेश पटेल, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
दोन मार्ग अपेक्षित
रोटेगाव-कोपरगाव आणि औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव हे रेल्वे मार्ग होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे किमान हे दोन्ही मार्ग मार्गी लागतील, अशी आशा आहे. औरंगाबादला पीटलाईन होणे गरजेचे आहे.
- अनंत बोरकर,अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
मराठवाड्याच्या काही अपेक्षा
मनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.
रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि.मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.
औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या ८८ कि.मी. च्या नव्या मार्गाचे काम लवकर होणे.
मुंबई, दिल्ली, बंगळुरूसाठी नव्या रेल्वे सुरू होणे.
औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यासाठी निधी मिळणे.