औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा; धरणे मृतसाठ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:38 PM2019-07-01T18:38:47+5:302019-07-01T18:41:14+5:30
जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. जून महिना संपला; परंतु या २३ दिवसांत प्रकल्प क्षेत्रांत पाऊस न झाल्यामुळे ते प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे मोठे धरण असून, ते सध्या मृतसाठ्यात आहे. या वर्षी धरण क्षेत्रात फार कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत ११२ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.
जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे. २०५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता त्या प्रकल्पांत आहे. मध्यम प्रकल्पांत सुखना, लहुकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अजिंठा अंधारी, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव यांचा समावेश आहे. ३० जून रोजी या प्रकल्पांच्या हद्दीत शून्य टक्का पाऊस झाला आहे. यातील १२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. जिल्ह्यात १,३७२ गावे आहेत. त्यापैकी ७४३ गावे आणि २३८ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा आहे. १,०६४ टँकर सध्या सुरू असून, १९ लाख २३ हजार ६३४ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५३२ विहिरी प्रशासने अधिग्रहित केलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईच्या नियोजनासाठी वाढीव अनुदानाची गरज पडू शकते.
७३ लघु प्रकल्प कोरडेठाक
९३ लघु प्रकल्पांतील ७३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ११ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. ९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ९३ लघु प्रकल्पांत सध्या फक्त १ टक्का पाणी शिल्लक आहे. १८८ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या त्या प्रकल्पांत असून, सदरील प्रकल्पांत गेल्या वर्षी ७.१४ टक्के पाणी होते.
आता टंचाईचे नियोजन शासनाकडे
टंचाईचे नियोजन आता शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे. दर तीन महिन्यांच्या नियोजनानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. ३० जूनपर्यंत टंचाईचे नियोजन होते. तसेच नवीन अध्यादेशानुसार टंचाई, आपत्ती नियोजनावर काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला आहे. प्रकल्पातही कमी पाणीसाठा आहे. याचा प्रशासन आढावा घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ७ लाख हेक्टरच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा जिल्ह्यात आहे. खरीप पेरणीचे अहवाल घेतले जात आहेत. त्यानुसार प्रशासन नियोजन करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.