खर्चाला फाटा; मदतीला नाही तोटा
By Admin | Published: September 8, 2014 12:10 AM2014-09-08T00:10:42+5:302014-09-08T00:56:18+5:30
संजय तिपाले , बीड गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीने वर्गणी गोळा करुन नाचगाण्यांवर उधळपट्टी करणारी मंडळे जागोजागी पहायला मिळतात; पण काही मंडळांनी उत्सवाला जोड दिली
संजय तिपाले , बीड
गणेशोत्सवाच्या नावाखाली सक्तीने वर्गणी गोळा करुन नाचगाण्यांवर उधळपट्टी करणारी मंडळे जागोजागी पहायला मिळतात; पण काही मंडळांनी उत्सवाला जोड दिली सामाजिक उपक्रमांची! विघ्नहर्त्याच्या उत्सवात मयताच्या कुटुंबियांना मदत, वाचनालय, स्पर्धा, प्रबोधन अशा जाणिवा दिसून आल्या. सामाजिक भान जपत मंडळांनी आदर्श घालून दिला आहे.
गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची पूर्वापार परंपरा आहे. गणेशोत्सवातूनच अनेक कलावंत घडले आहेत. कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. मात्र, बदलत्या काळानुसार उत्सवाला ‘हायटेक’ स्वरुप प्राप्त झाले. बाप्पांचा हा उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करताना काही मंडळे केवळ मिरवणुका व नाचगाण्यांवर लाखोंचा चुराडा करताना दिसतात. मात्र, काही मंडळांनी सामाजिक जाणिवा जपत आदर्श समोर ठेवला आहे.
राष्ट्रीय गणेश मंडळाने केले प्रबोधन
बीड येथील राष्ट्रीय गणेश मंडळाने यंदाही प्रबोधन कार्यक्रम घेऊन वेगळेपण जपले. मंडळाचे अध्यक्ष अमृत सारडा याच्यासह पदाधिकाऱ्यांनी बेटीबचाव, पर्यावरण रक्षणावर प्रबोधन कार्यक्रम, संकटकालीन महिला, मुलींसाठी हेल्पलाईन क्रमांक दर्शविणारे स्टिकर्स आदी उपक्रम राबविले. याशिवाय विविध स्पर्धाही पार पडल्या. विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर होणार असल्याचे सारडा म्हणाले़
एकदंत मंडळाने सुरु केले वाचनालय
बीडमध्ये सारडानगरीतील एकदंत गणेशमंडळाने वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. मंडळाचे अध्यक्ष अनूप मंत्री यांनी उत्सवकाळात व्याख्यान, रक्तदान शिबीर, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, स्पर्धा असे विविधांगी कार्यक्रम घेतले. चित्रपट अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला.
भू्रण हत्याविरोधी जनजागृती
माजलगावात न्यू. छत्रपती गणेश मंडळाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला. मंडळाच्या वतीने पर्यावरण संरक्षण व स्त्री- भू्रणहत्येविरोधी रॅली काढण्यात आली. यावेळी तिनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता़
परळी तालुक्यातील नाथ्रा येथे २२ आॅगस्ट रोजी अपघातात सखाराम उर्फ राजाभाऊ धोंडीबा गात हा तरुण ठार झाला होता.
४घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले होते. परळी ग्रामीण ठाण्याचे जमादार आर. बी. सिरसाट यांनी पोहेनेरच्या मंडळांकडे आर्थिक सहायाचा प्रस्ताव ठेवला.
४सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष बाजीराव काळे, चक्रधर गणेश मंडळाचे अध्यक्ष बापूराव काकडे व शेतकरी गणेश मंडळाचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी वर्गणीतून जमा झालेले एक लाख रुपयांची मदत गात कुटुंबियांना दिली़