औरंगाबादेतील विसर्जन विहिरींचा गाळ काढण्यासाठी ४२ लाख रुपयांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 03:21 PM2021-09-13T15:21:14+5:302021-09-13T15:23:10+5:30
Ganesh Mahotsav Aurangabad : संघर्षनगर, मुकुंदवाडी, संतोषीमाता नगर आणि सिडको एन-१२ या चार विहिरींमधील गाळ काढण्याचे काम देण्यात आले.
औरंगाबाद : शहरातील विसर्जन विहिरींच्या ( Ganesh Mahotsav ) स्वच्छतेचे काम महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) हाती घेतले असून, सध्या हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. परंपरागत ९ विहिरींमधील गाळ काढणे, दोन कृत्रिम तलाव तयार करणे अशा एकूण अकरा विहिरींच्या कामावर ४२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. जालाननगर येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत.
दरवर्षी मनपाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते. शहरात ९ विहिरींमध्ये विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. दोन ठिकाणी कृत्रिम तलावात विसर्जनासाठी सोय करण्यात येते. गणेशोत्सवापूर्वी विहिरींमधील गाळ काढण्यात येतो. पूर्वी हा खर्च १ कोटीपर्यंत जात होता. नवीन विहिरी खोदण्यासाठी सरासरी ३ ते ४ लाख रुपयांचा खर्च येतो. महापालिकेकडून एका विहिरीतील गाळ काढण्यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च दाखवत असत. या प्रकारावर प्रचंड टीका झाल्यानंतर पन्नास टक्के खर्च कमी करण्यात आला.
संघर्षनगर, मुकुंदवाडी, संतोषीमाता नगर आणि सिडको एन-१२ या चार विहिरींमधील गाळ काढण्याचे काम देण्यात आले. हे काम तब्बल १६ लाख ६० हजार रुपयांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित पाच विसर्जन विहिरींचा गाळ काढणे आणि दोन कृत्रिम तलाव करण्याचे कामही सुरू आहे. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या कामांची पाहणी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय लवकरच करणार असल्याची माहिती उपअभियंता बी.डी. फड यांनी दिली. सर्वच विसर्जन विहिरींच्या ठिकाणी ३ दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाची तयारी झालेली आहे.
गणेश विसर्जन विहिरी
भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन-१२, संघर्षनगर, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योतीनगर (कृत्रिम तलाव), हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव)