औरंगाबाद मनपाचा वॉर्ड कार्यालय स्थलांतरास ८२ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:44 PM2018-04-09T13:44:03+5:302018-04-09T13:46:22+5:30
महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून मनपाच्या तिजोरीवर अक्षरश: दरोडे टाकण्याचे काम सुरू आहे. क्रांतीचौक पाण्याच्या टाकीजवळील वॉर्ड कार्यालय जालना रोडवरील मोंढानाका येथे स्थलांतरित करण्यासाठी अगोदर ४९ लाखांचा खर्च दाखविण्यात आला. हाच खर्च आता ८२ लाखांपर्यंत नेण्यात आला असून, शनिवारी स्थायी समितीनेही वाढीव प्रस्तावाला क्षणार्धात मंजुरी देऊन टाकली. विशेष बाब म्हणजे प्रशासनाकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
महापालिकेचे झोन ९ क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीजवळ आहे. हे कार्यालय जालना रोडवरील मुळे-तापडिया कॉम्प्लेक्समधील जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये मनपाच्या मालकीची जागा असून, या जागेत वॉर्ड अभियंता आणि वॉर्ड अधिकारी, संपूर्ण कर्मचारी काम करतील. नवीन कार्यालयात सोयी- सुविधा देण्यासाठी मनपाने तब्बल ८२ लाख रुपयांच्या दोन निविदा मंजूर केल्या आहेत. ही दोन्ही कामे एस. एम. कन्स्ट्रक्शनला दिली गेली आहे. स्थायी समितीने शनिवारी कोणत्याही चर्चेविना दोन्ही निविदा मंजूर केल्या. मनपाने या कामासाठी आधी ४९ लाख ५६ हजार रुपयांच्या दोन निविदा काढल्या होत्या. त्यानंतर ठेकेदारास कायार्रंभ आदेशही दिले गेले. कामही सुरू केले. अंदाजपत्रकात सुधारणा करून ते ४९ लाखांहून चक्क ८२ लाखांचे करण्यात आले. पाऊण कोटी रुपयांच्या कामांची खरोखरच वॉर्ड कार्यालयात गरज आहे का? हे तपासण्याचे कामही कोणी केले नाही.