पावसाळ्यात तलावातून तर, इतर वेळी चंद्रावरून चालण्याचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:02 AM2021-07-21T04:02:17+5:302021-07-21T04:02:17+5:30
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्याला जोडणाऱ्या बोरगाव-नागापूर रस्त्यावरून जाताना तुम्हाला जागोजागी तळे साचलेले दिसेल, तसेच अनेक ठिकाणी खाचखळग्यांमुळे चंद्रावर ...
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्याला जोडणाऱ्या बोरगाव-नागापूर रस्त्यावरून जाताना तुम्हाला जागोजागी तळे साचलेले दिसेल, तसेच अनेक ठिकाणी खाचखळग्यांमुळे चंद्रावर चालण्याचा अनुभव घेता येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झालेली ही कलाकृती, मात्र लोकांना का नकोशी झालीय, हे समजणे कठीण झाले आहे. सर्व जण या कलाकृतीकडे दुर्लक्ष करून नुसते या रस्त्याच्या नावे बोटे मोडत असल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.
निसर्गाचं देणं लाभलेल्या चिंचोली लिंबाजी परिसराला गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचे ग्रहण लागले आहे. यामुळे परिसराचा विकास ठप्प झाला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून चिंचोली लिंबाजी ते करंजखेड या दहा कि.मी. रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. रस्त्यावर जागोजागी ५०-५० फुटांपर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांसाठी हा रस्ता मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा जरी पाऊस पडला की या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून तलावाचे स्वरूप येते. तसेच इतर वेळी चंद्रभूमीवरून चालण्याचा अनुभव येतो. तुंबलेल्या तलावातून तसेच मोठमोठ्या खाचखळग्यांतून वाट काढताना प्रवाशांसह वाहनांचीही नुसती वाट लागत आहे. या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या अनेकांना मानेचे व मणक्याचे आजार जडले आहेत. तसेच राेज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.
कोट....
या महत्त्वाच्या रस्त्याची चाळण झाल्याने वाहनधारकांना मणक्याचे व पाठीचे विविध आजार जडले आहेत. खराब रस्त्यांमुळे चिंचोली ते बालखेड हे ६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागतो. वाहनांचे पार्ट खिळखिळे होत असल्याने वाहन दुरुस्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
-गणेश ढोरमारे, रिक्षाचालक, बालखेड
फोटो : चिंचोली लिंबाजी ते करंजखेड या रस्त्यावर खड्ड्यांमुळे साचलेले तळे.
200721\20210716_094223.jpg
चिंचोली लिंबाजी ते करंजखेड या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाल्याने रस्त्याला असे तळ्याचे स्वरूप आले आहे...छाया प्रशांत सोळुंके