आंतरपीक पद्धतीचा प्रयोग राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:04 AM2021-05-25T04:04:16+5:302021-05-25T04:04:16+5:30
सोयगाव : आगामी खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणे वितरण करताना कृषी विभागाने सोयगाव तालुक्यात तूर, सोयाबीन या आंतरपिकांचा ...
सोयगाव : आगामी खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणे वितरण करताना कृषी विभागाने सोयगाव तालुक्यात तूर, सोयाबीन या आंतरपिकांचा तीस हेक्टरचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात मंडळनिहाय दहा हेक्टर प्रकल्पासाठी तूर आणि सोयाबीन पिकांची बियाणे अनुदान तत्त्वावर देण्यात येणार आहे.
सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात आंतरपिकांच्या पद्धतीत वाढ झाली आहे. यामध्ये शेतकरी कपाशी पिकात विविध आंतरपिके घेण्याचा नवनवीन प्रयोग हाती घेऊन यामध्ये तूर-सोयाबीन या पिकांच्या आंतरपिकांच्या प्रयोगासाठी अनुदान तत्त्वावर तीस हेक्टरवर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कपाशी पिकामध्येही आंतरपिके घेतली जातात. आंतरपिके पद्धतीत सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंतरपीक पद्धतीत सोयाबीन व तूर पिकांच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात मक्याचा दोनशे हेक्टरवर प्रकल्प
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात सोयगाव तालुक्यात मका पिकाच्या लागवडीसाठी दोनशे हेक्टरवर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी तातडीने पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.