‘नवीन संहितांवर प्रयोग करावेत’
By Admin | Published: November 16, 2014 12:01 AM2014-11-16T00:01:26+5:302014-11-16T00:01:26+5:30
औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो
औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो. या नवोदित कलाकारांच्या मेहनतीला राज्य नाट्यस्पर्धेसारख्या व्यासपीठावर नवीन संहितांचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी राज्य नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.
तापडिया नाट्यमंदिरात आयोजित हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या प्रथम फेरीचा शुभारंभ सोहळा पार पडला. या नाट्यस्पर्धेची सुरुवात किरण लद्देलिखित ‘अघटित’ या दोन अंकी नाटकाने झाली. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. दिलीप घारे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत पाठक, भारत जगताप, गजानन कराड आदींची उपस्थिती होती.
नवोदित लेखकांनी आपल्या समस्या, आपले प्रश्न लिखाणात आणावेत, त्याचे नाटकात रूपांतर करावे, असे केल्यास रसिकांचा प्रतिसाद वाढणार हे नक्की. या पद्धतीने नाटके सादर करीत गेल्यास या स्पर्धेची भूमी हीच खरी रंगभूमी आहे, असे मानले जाईल, असा विश्वासही डॉ. घारे यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाकांक्षी कलाकारांनी या स्पर्धेत उतरल्यास तसेच मार्गदर्शनयुक्त नाटकाचे प्रयोग सादर केल्यास हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा ही कलाकारांसाठी मोलाची व मानबिंदू ठरेल. तसेच नवोदित नाट्यलेखकांनी आपल्या लिखाणात सामाजिक पर्यावरण, सामाजिक परिस्थिती, मानसिकता यासारख्या विषयांचा समावेश केल्यास सादरीकरणात निश्चितच बदल घडून येईल व रसिकांचा नाटकाकडे असलेला ओढा वाढेल, असे मत अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले.