प्रयोगशील शाळा : अल्पावधीतच कात टाकत शाळेची प्रयोगशीलतेतून गुणवत्तेकडे झेप...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:08 PM2019-06-17T12:08:03+5:302019-06-17T12:21:12+5:30
प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देण्याच्या सादेला पालकांचा प्रतिसाद
- मुबीन पटेल
पिशोर (औरंगाबाद ) : कन्नड तालुक्यातील आमदाबाद जि.प. शाळेने अल्पावधीतच कात टाकून गुणवत्तेकडे झेप घेतली आहे. प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देण्याच्या सादेला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही शाळा तालुक्यातील प्रयोगशील शाळेमध्ये अग्रेसर आहे.
आमदाबाद गावात साधारणत: १९६२ मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली. पूर्वी गावात असलेल्या शाळेला युवा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून छोटी, पण रोडलगत जागा व नवीन इमारत मिळाली. सध्याच्या युगात खासगी व इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले असताना लोकसहभाग, शिक्षकांचे प्रयत्न, जागरूक पालक, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य यांच्या समन्वयातून अल्पावधीतच कोणत्याही स्पर्धेत टिकण्यास सक्षम अशी सुसज्ज व कॉर्पोरेट शाळा आमदाबाद गावात उभी राहिली.
२०१४ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालक जागृती करून शाळेला तब्बल ७५ हजार रुपये लोकवर्गणी मिळवून दिली. यातून येथे सुसज्ज ध्वनी व्यवस्थेसह बिग स्क्रिन प्रोजेक्टर व डिजिटल वर्ग साकारण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनातून मिळालेली रक्कम वापरून पूर्ण शाळेचे विद्युतीकरण, पंख्यांची व्यवस्था झाली. ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून दोन एलईडी, एक संगणक संच व वॉटर फिल्टर शाळेला भेट दिल्याने सुविधांमध्ये भर पडली. यामुळे प्रयोग करणे सोयीचे झाले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सिद्दीकी, पं.स. सदस्या नंदाबाई बनकर, विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे व केंद्रप्रमुख डी. टी. शिंदे यांचे मार्गदर्शन नेहमी असते.
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती
पहिली ते सातवीपर्यंत येथे वर्ग असून, आजघडीला शाळेची पटसंख्या ११२ असून, यात ५७ मुले व ५५ मुलींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यातील तब्बल २० मुले ही आमदाबादबाहेरील असून, त्यांनी खाजगी शाळांमधील प्रवेश रद्द करून जिल्हा परिषद शाळेची निवड केली आहे. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती असते, हे विशेष आहे.
शाळेचे भविष्यातील उपक्रम
- सर्व वर्गखोल्या डिजिटल करणे, निधी मिळाल्यास संगणक लॅब स्थापन करणे.
- अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळेचा दर्जा टिकविणे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राबविण्याची पात्रता प्राप्त करणे.
- ‘तेजस’ हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने इंग्रजी विषयाची चांगली सोय झाली असून यापुढे असे नवनवीन प्रयोग करुन शाळेचा निकाल १०० टक्के लावणार.
पालक काय म्हणतात?
- शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे प्राथमिक शाळा. बदलाची सुरुवात येथूनच व्हावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम फळाला आले. शाळेत नवनवीन प्रयोग राबविल्याने मुलांना शाळेची गोडी लागली आहे. ती कायम राहावी. -छायाबाई पवार
- माझा मुलगा पूर्वी औरंगाबाद येथील एका नामांकित शाळेत शिकत होता. परंतु खर्चाच्या तुलनेत अपेक्षित परिणाम न मिळाल्याने मी त्याचा प्रवेश आमदाबाद शाळेत घेतला. त्याची प्रगती बघून मला माझा निर्णय योग्य ठरल्याचे समाधान आहे. - संदीप घडमोडे
जिल्हा परिषद शाळा ही केवळ गरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी शाळा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पहिला व एकमेव पर्याय आहे आणि हेच सिद्ध करण्याच्या दृष्टीने आमचा सदैव प्रयत्न असेल.
- राजू सांडू बनकर,शालेय समिती अध्यक्ष
एका प्रयोगशील शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ग्रामस्थ व सर्व सहकारी यांच्या सहयोगातून शाळेला जिल्ह्यातील आदर्श शाळांच्या पंक्तीत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
- कमलाकर सुरडकर,मुख्याध्यापक