जलजागृतीच्या बैठकीला तज्ज्ञांचा दुष्काळ
By Admin | Published: March 15, 2016 12:40 AM2016-03-15T00:40:56+5:302016-03-15T00:40:56+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत. जलजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याचे शासनाचे आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ३१ जलतज्ज्ञांच्या बैठकीसाठी बोटावर मोजण्याइतकेच सदस्य हजर राहिले. दुष्काळात तरी पाण्याबाबत सतर्कता आणावी, अशी अपेक्षा असताना महसूल प्रशासनासह सिंचन, पाटबंधारे विभागाला दुष्काळाचे काहीही देणे घेणे नसल्याचा प्रत्यय आला. शासनाच्या ११ फेबु्रवारीच्या आदेशामुळे फक्त कागदी घोडे नाचविण्यापुरताच बैठकीचा फार्स केला गेला.
बैठकीच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे या कामात व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या दालनात दुपारी १२.३० वा. बैठक झाली. ती बैठक २० मिनिटांत गुंडाळण्यात आली. सिंचन, पाटबंधारे आणि जीवन प्राधिकरणासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि काही माध्यम प्रतिनिधींची त्या छोटेखानी बैठकीला हजेरी होती. मनपा, प्रगतिशील शेतकरी, जलतज्ज्ञ, जायकवाडी प्रकल्पाचे प्रतिनिधी त्या बैठकीकडे फिरकलेदेखील नाहीत. कुणालाही पाण्याच्या दुष्काळाबाबत काहीही आस्था राहिली नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह तब्बल दोन तास बैठकीची वाट पाहत होते. या काळात सभागृहातील सर्व ए.सी, बल्ब, फॅन सुरू होते.
बैठक होणारच नव्हती, तर विजेचा अपव्यय थांबविण्याची तसदीदेखील कुणीही घेतली नाही. जिल्हा प्रशासनात कुणाचाही कुणावर धाक नसल्याचे हे उदाहरण आहे. उपजिल्हाधिकारी गावंडे म्हणाले, पैठणला जलजागृती सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी होईल. कलशपूजन व इतर कार्यक्रम तेथे होतील. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता एस.व्ही.खरात म्हणाले, अधिवेशनासाठी अधिकारी गेल्यामुळे बैठकीला कमी सदस्य हजर राहिले.