हद्दपारीची मुदत संपल्याने सव्वाशे गुंड परतले शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:59 PM2020-03-05T19:59:36+5:302020-03-05T20:01:21+5:30
मनपा निवडणुकीत उपद्रव वाढण्याची शक्यता
- बापू सोळुंके
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कालावधीत २०१७ मध्ये हद्दपार करण्यात आलेले तब्बल सव्वाशे गुंड हद्दपारीची मुदत संपल्याने शहरात परतल्याचे समोर आले आहे. यातील काही गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत पोलीस अलर्ट नाहीत. महापालिका निवडणुका जवळ आल्याने या गुन्हेगारांचा शहरात उपद्रव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२०१७ साली गुन्हेगारांवर अंकु श ठेवण्यासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ सोबतच दोन अथवा त्याहून अधिक गुन्हे असलेल्या आरोपींना शहरातून हद्दपार करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले होते. आयुक्तांचेच आदेश असल्याने शहरातील १७ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या हद्दीतील पंधरा ते वीस गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सहायक आयुक्तांमार्फत परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्तांकडे सादर केला होता.
प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्यानंतर उपायुक्तांनी २०१७ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६० हून अधिक गुंडांवर सहा महिने ते दोन वर्षे कालावधीसाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतून हद्दपारीची कारवाई झाली होती. यातील काहींना केवळ शहरातून तर काहींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आली होती. यामुळे २०१७ मध्ये सुमारे १२० ते १२५ गुंड शहराबाहेर गेले होते. हद्दपारीची मुदत संपल्याने ९०-९५ टक्के गुंड औरंगाबादेत परतले आहेत. हे गुंड काय करतात, याची माहिती मात्र पोलीस दप्तरी नाही. उर्वरित पाच ते दहा टक्के गुंडांनी परगावीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याने ते शहरात आले नसावे, असा अंदाज एका अधिकाऱ्याने व्यक्त केला.
सुमारे २५ टक्के हद्दपारी झाली होती रद्द
पोलीस उपायुक्तांनी बजावलेल्या हद्दपारीच्या आदेशाला प्रत्येक गुन्हेगार विभागीय आयुक्तांकडे आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देतो. २०१७ मध्ये उभय कोर्टात २५ टक्के लोकांच्या हद्दपारीच्या नोटिसा रद्द झाल्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले.
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास तीन वर्षे शिक्षा
हद्दपारीची मुदत संपण्यापूर्वी विनापरवानगी शहरात येणाऱ्या तडीपार गुंडाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जातो. न्यायालयातून त्याला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्याला शहराबाहेर जाण्याचा आदेश दिला जातो. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यास हद्दपार व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
हद्दपारीची मुदत संपल्यानंतर कोणतीही कारवाई नाही
एखाद्या गुंड प्रवृत्तीची व्यक्ती हद्दपारीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुन्हा शहरात येऊन राहू शकते. त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करता येत नाही. शहरात परतल्यानंतर त्याने येथे कोणताही गुन्हा केला तर त्या गुन्ह्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध पोलीस कारवाई करतात. -डॉ. राहुल खाडे, उपायुक्त परिमंडळ-१