खडकीनजीक स्फोटकाचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:38 AM2017-10-26T00:38:27+5:302017-10-26T00:38:37+5:30
: तालुक्यातील खडकी गावानजीक एका जीपमधून पोलिसांनी अवैध स्फोटकाचा साठा जप्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत सुपर पॉवर कंपनीची स्फोटके, १४०० काड्या (सात बॉक्स) जप्त केल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तालुक्यातील खडकी गावानजीक एका जीपमधून पोलिसांनी अवैध स्फोटकाचा साठा जप्त केला असून याप्रकरणी दोघांविरुद्ध लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत सुपर पॉवर कंपनीची स्फोटके, १४०० काड्या (सात बॉक्स) जप्त केल्या आहेत.
बुधवारी सकाळी एक जीप खडकी गावानजीक संशयास्पद स्थितीत विशेष पोलीस पथकाला आढळून आली. या जीपची तपासणी केली असता जीपमध्ये १४०० काड्या व १४०० इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर आढळून आले. याप्रकरणी नथुराम साळवी आणि देवीलाल साळवी या दोघांना अटक करण्यात आली आहे. जवळपास ४२ हजारांचे स्फोटके जप्त करण्यात आली. स्फोटकांच्या खरेदी- विक्रीची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. याप्रकरणी लिंबगाव ठाण्यात भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ सह कलम २८६-३४ नुसार लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ४२ हजारांच्या स्फोटकासह एक जीप असा एकूण ८ लाख ४२ हजार रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली. दरम्यान, खडकीनजीक आढळलेल्या या स्फोटकामुळे परिसरासह शहरातही काही काळ खळबळ उडाली होती. अशाच पद्धतीने इतर ठिकाणीही कार्यवाही होण्याची आवश्यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे.