पैठण एमआयडीसीत स्फोट
By Admin | Published: May 24, 2016 12:11 AM2016-05-24T00:11:16+5:302016-05-24T01:20:31+5:30
जायकवाडी : पैठण एमआयडीसीमध्ये केमिकल बनवणाऱ्या सेटलाईट फार्मा कंपनीमध्ये शॉर्टसर्कि टमुळे क्रॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला
जायकवाडी : पैठण एमआयडीसीमध्ये केमिकल बनवणाऱ्या सेटलाईट फार्मा कंपनीमध्ये शॉर्टसर्कि टमुळे क्रॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला. सोमवारी (दि.२३) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीत मयत कामगाराच्या नातेवाईक व या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पैठण एमआयडीसीमध्ये सेटलाईट फार्मा ही केमिकल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीत सोलनापूर (ता.पैठण) येथील बबन शंकरराव खराद (४८) हे मागील २० वर्षांपासून या कंपनीत काम करीत होते. आज सकाळी ८.३० वाजता बबन खराद हे कंपनीमध्ये कामावर आले. दुपारी २ वाजता जेवणाच्या सुट्टीमध्ये कॉम्प्रेसर मशीनवर काम करत असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे होऊन कंपनीसमोरील रस्त्यावर जाऊन पडले.
घटनेची माहिती मिळताच बबन खराद यांच्या नातेवाईकांसह या परिसरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते ,नागरिकांनी कंपनीमध्ये गर्दी केली. त्यामुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता .पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र शिंदे यांनी ताबडतोब कंपनीमध्ये धाव घेऊन वातावरण शांत केले. या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून कामगारास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार व्यस्थापनाने नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तेथून मृतदेह हलविण्यात आला. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सपोनि रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय मोरे, शरद पवार,जाकेर शेख,विठ्ठल एडके करीत आहेत. मृत बबन खराद यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली,पत्नी ,आई,दोन भाऊ असा परिवार आहे.