पेट्रोल पंप मॅनेजरवर हल्ला करून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:02 AM2021-07-23T04:02:27+5:302021-07-23T04:02:27+5:30
खुलताबाद : वेरूळ येथे पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या मॅनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रुपये लंपास केल्याची ...
खुलताबाद : वेरूळ येथे पेट्रोल पंपांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जाणाऱ्या मॅनेजरवर हल्ला करून साडेपाच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. या टोळीला खुलताबाद पोलिसांनी ४८ तासांतच जेरबंद केले आहे.
वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मॅनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शनिवारी व रविवारी पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रुपये वेरूळ येथील बँकेत जमा करण्यासाठी दुचाकीवर चालले होते. उड्डाणपुलाखाली मॅनेजर अशोक काकडे यांना अडवून प्राणघातक हल्ला करीत त्यांच्याकडील ५ लाख ३७ हजार रुपयांची पैशाची बॅग हिसकावून आरोपी दुचाकीवर पळून गेले होते. दरम्यान, पेट्रोल पंपांचे मालक विजय आसाराम बोडखे यांनी या संदर्भात खुलताबाद पोलिसांत फिर्याद दिली होती. पोनि. सीताराम मेहेत्रे यांनी तपासाची चक्रे फिरविली. तपास करीत असताना पेट्रोल पंपावर पूर्वी काम करणारा व नंतर कामावरून कमी केलेल्या प्रकाश कल्याण चुंगडे (२१, रा. खापरखेडा, ता. कन्नड) याच्यावर संशयाची सुई फिरली. त्याआनुषंगाने तपास करीत हा गुन्हा चुंगडे याने महेंद्र रामदास साळुंके (२१, रा. मणूर ता. वैजापूर), नितीन घाशीराम राजपूत (रा. खापरखेडा), अर्जून मिठ्ठू ताटू (रा. रूपवाडी ता. कन्नड) यांनी केल्याचे उघड झाले. त्यांना २१ जुलै रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आणखी काही साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे मान्य केले. आरोपींना २४ जुलैपर्यंत खुलताबाद न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
चौकट
आरोपींकडून मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींना २१ जुलै रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम ३ लाख ११ हजार ६७० तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी किंमत (६० हजार रुपये), ३ मोबाइल (किंमत १५ हजार रुपये) असा एकूण ३ लाख ८६ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोनि. सीताराम मेहेत्रे, पोहेकॉ. नवनाथ कोल्हे, यतीन कुलकर्णी, भगवान चरावंडे, के. के. गवळी, सुहास डबीर, कृष्णा शिंदे, रूपाली सोनवणे, रामदास दिवेकर, प्रमोद गरड यांनी केली.
फोटो कॅप्शन : खुलताबाद पोलिसांनी पकडलेली टोळी.