अजब नियमांमुळे मुकुंदवाडीवर एक्स्प्रेसला ‘रेड सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:02 AM2021-01-09T04:02:16+5:302021-01-09T04:02:16+5:30
औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता ...
औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता येत नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी यापेक्षा कमी अंतर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवरून नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन हे रेल्वेच्या एनएसजी- ५ या गटात आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावर एनएसजी - ५ गटांत मोडणारे सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी हे रेल्वेस्टेशनही आहेत. यातील काही रेल्वेस्टेशनवर दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. परंतु मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे अद्यापही एकाच बाजूने प्लॅटफॉर्म आहे. सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी या ठिकाणी काही एक्सप्रेस रेल्वे थांबतात; मात्र मुकुंदवाडी या रेल्वे स्टेशनवर फक्त एकच एक्सप्रेस आणि काही पॅसेंजर रेल्वे थांबतात.
मुकुंदवाडी स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्याची मागणी केल्यानंतर मुख्य रेल्वे स्टेशनपासून मुकुंदवाडीचे अंतर कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक मुख्य रेल्वेस्टेशन आणि दुसरे स्टेशन कमी अंतर असताना, या ठिकाणी एक्सप्रेस रेल्वे थांबविण्यात येतात. औरंगाबादला वेगळा न्याय आणि अन्य भागांसाठी वेगळा न्याय रेल्वे विभागाकडून देण्यात येत असल्याची ओरड होत आहे.
अशी आहेत रेल्वेस्टेशन व अंतर
मुख्य रेल्वेस्टेशन ते जवळचे रेल्वेस्टेशन - अंतर (मिनिटांत)
सिकंदराबाद ते मलकाजगिरी - ८ मिनिटे
नागपूर ते अंजणी - ८ मिनिटे
औरंगाबाद ते मुकुंदवाडी - १० मिनिटे
--
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन
प्रवासी संख्या-४५७८२
उत्पन्न-२७,७३,७७३ रुपये (जानेवारी २०१९)
रेल्वेची दुटप्पी भूमिका
मराठवाड्यातील अन्य रेल्वेस्टेशनच्या तुलनेत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनहून येणारे उत्पन्न अधिक आहे. इतर शहरांत ८ मिनिटे अंतरावर असलेल्या रेल्वेस्टेशनवर एक्सप्रेस रेल्वे थांबविता येतात. मग १० मिनिटांच्या अंतरावरील मुकुंदवाडीला का थांबविता येत नाही. रेल्वे विभागाचा औरंगाबादबाबतीत अद्यापही दुटप्पी भूमिका सुरू आहे.
- ओमप्रकाश वर्मा , अध्यक्ष,मराठवाडा रेल्वे विकास समिती