सदृढ लोकशाहीसाठी जबाबदारीने अभिव्यक्त व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:42 PM2019-02-07T23:42:16+5:302019-02-07T23:42:40+5:30
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.
औरंगाबाद : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणुकीत सोशल मीडियाचे महत्त्व अधिक असणार आहे. यात नकारात्मक भावना बाजूला सारून सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभिव्यक्त व्हावे, अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ‘पॉलिटिकल कट्टा’ या नावाने सुरू केलेल्या या उपक्रमात विविध समस्यांवर राजकीय चर्चा घडवून आणली जाणार आहे. पहिल्याच पॉलिटिकल कट्ट्यात ‘सोशल मीडिया अॅण्ड इटस् आफ्टर इफेक्टस्’ या विषयावर चर्चा घेण्यात आली. यात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, युवक काँग्रेसचे समर्थ हनुमंत पवार, भाजयुमोचे कार्यकर्ते मल्हार गंधे, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे अॅड. अभय टाकसाळ यांना अमंत्रित केले होते. निवेदकाची भूमिका ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. आमची कोणती जात नाही, कोणता धर्म नाही; पण संविधानाने घालून दिलेल्या संकेतांचे पालन करून सुदृढ लोकशाहीसाठी अभिव्यक्तीचे एक जबाबदार व्यासपीठ आम्ही तरुणांना उपलब्ध करून देत आहोत. यानंतरदेखील विविध विषयांवर पोलिटिकल कट्ट्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे डॉ. अमृतकर यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला डॉ. शुजा शाकीर, डॉ. दासू वैद्य, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. उल्हास उढाण, राजेश मुंढे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कोण काय म्हणाले...
- आमदार जलील म्हणाले की, सोशल मीडियामुळे देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, येणाऱ्या काळात राजकारणात सोशल मीडियाचा वापर सर्वात जास्त होणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला. याचा गैरवापरही करण्यात आला असल्याचा आरोप केला.
- भाजयुमोचे मल्हार शिंदे म्हणाले की, आजपर्यंत राजकीय नेते जनतेपर्यंत पोहोचत नव्हते. आता लोकच नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. ही एक क्रांती झाली आहे. एखादी घटना तात्काळ व्हायरल होऊ लागल्यामुळे नेतेही सावधपणे बोलताना दिसून येत आहेत.
- युवक काँग्रेसचे हणमंत पवार म्हणाले की, सोशल मीडियावर व्यक्त होताना संसदीय संकेत पाळले पाहिजेत, असा आदेश आमच्या पक्षाकडून दिला जातो. जो कार्यकर्ता याचे पालन करीत नाही त्यांना नोटीस दिली जाते किंवा काढून टाकले जाते.
- सीपीआयचे अॅड. अभय टाकसाळ म्हणाले की, आमचा पक्ष ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो तो शोषित आणि वंचित समूह असल्यामुळे त्यांच्याकडे अॅण्ड्रॉईडचे फोन नाहीत, तरीपण जेवढे शक्य आहे तेवढा वापर करून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आलो आहोत. राजकीय पक्ष सोशल मीडिया वापरत आहेत की, सोशल मीडिया राजकीय पक्षांचा वापर करीत आहे, हे कळत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.