विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 12:48 AM2017-04-29T00:48:52+5:302017-04-29T00:52:34+5:30
जालना : मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले.
जालना : ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर राहण्याच्या कारणावरून मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले.
तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात थांबून गावातील विविध कामे आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी नेमूण दिलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नसल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक गावांत थांबत नसलयाच्या तक्रारीही अनेक गावातील ग्रामस्थांनी केल्या होत्या.
परिणामी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या आदेशाची पायपल्ली जिल्ह्यात होत आहे. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचकच राहिला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची २४ एप्रिल रोजी मंठा येथे टंचाई आराखड्यासाठी बैठक असल्याने संपूर्ण तालुक्यातील प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते.
पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे बैठकीला हजर राहिले नसल्याचा ठपका ठेवत त्यांना २५ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी सांगितले.
दरम्यान ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी या मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथील प्रकरणाला बनावट फेरफार व मृत्यूप्रकरणाची किनार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. (प्रतिनिधी)