पीएच.डीसाठी नोंदणीची मुदत वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:06 AM2021-03-21T04:06:12+5:302021-03-21T04:06:12+5:30

औरंगाबाद : प्र-कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीच्या शिफारसींचा विचार न करताच जाहीर केलेले पीएच.डी.साठी नोंदणीचे वेळापत्रक तूर्त स्थगित करण्यात ...

Extension of registration period for Ph.D. | पीएच.डीसाठी नोंदणीची मुदत वाढण्याची शक्यता

पीएच.डीसाठी नोंदणीची मुदत वाढण्याची शक्यता

googlenewsNext

औरंगाबाद : प्र-कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उपसमितीच्या शिफारसींचा विचार न करताच जाहीर केलेले पीएच.डी.साठी नोंदणीचे वेळापत्रक तूर्त स्थगित करण्यात यावे, या उपसमितीच्या शिफारसींवर अगोदर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जावा व मगच नोंदणीला सुरुवात करावी, असा पवित्रा सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे जाहीर केलेले हे वेळापत्रक किमान आठ दिवस तरी पुढे ढकलले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘पेट’ उत्तीर्ण तसेच ‘पेट’मधून सूट मिळालेले संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पीएच.डीसाठी ऑनलाइन नोंदणी, तर एप्रिल महिन्यात संशोधन अधिमान्यता समितीच्या बैठका घेण्याचे जाहीर केले आहे. ‘पेट‘मध्ये ४ हजार २९९ विद्यार्थी पात्र ठरले असून ‘पेट’मधून सूट मिळालेल्या नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच एम.फील. असे पात्रताधारक २००-३०० विद्यार्थी आहेत. हे सर्व मिळून सुमारे साडेचार- पावणेपाच हजार विद्यार्थी पीएच.डी. करू इच्छितात. मात्र, विद्यापीठाकडे सध्या रिक्त असलेल्या ९०० जागा मार्गदर्शकांकडे उपलब्ध आहेत.

दरम्यान, महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र असेल, त्याठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जात असेल व दोन पात्र पदव्युत्तर शिक्षक असतील, अशा महाविद्यालयांतील मार्गदर्शकाकडेच संशोधन करता येते, या यूजीसीच्या मार्दर्शक सूचनेवर तोडगा काढण्यासाठी कुलगुरुंनी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या उपसमितीने ज्या महाविद्यालयांत संशोधन केंद्र आहे. त्या केंद्रालगतच्या महाविद्यालयीन मार्गदर्शक प्राध्यापकांस क्लस्टर पद्धतीने संशोधन करता येईल, अशी शिफारस केली आहे.

चौकट....

बैठक आयोजित करण्याचे कुलगुरुंना पत्र

तीन महिन्यांपूर्वीच उपसमितीने अभ्यास करून काही शिफारसी सुचविल्या आहेत. उपसमितीचा अहवाल कुलगुरुंकडे प्राप्त आहे. त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत तो सादर करावा. बैठकीतील बहुमताने शिफारसी स्वीकारल्या, तर मार्गदर्शकांची संख्या वाढेल व पीएच.डी. करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, डॉ. राजेश करपे, डॉ. फुुलचंद सलामपुरे, संजय निंबाळकर यांनी व्यक्त केली असून कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यासंबंधी पत्र दिले आहे. २५ मार्चपर्यंत ही बैठक अपेक्षित आहे.

Web Title: Extension of registration period for Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.