विद्यापीठातील पदव्युत्तरच्या प्रवेश नोंदणीसाठी ८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 07:39 PM2020-12-31T19:39:25+5:302020-12-31T19:41:53+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीईटी’ बंधनकारक
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली असून, आता ८ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
विद्यापीठातील ४५ विभागात तसेच उस्मानाबाद उपपरिसरातील १० विभागात ‘ऑनलाइन’ प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) रद्द करून पदवी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येईल. राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मात्र ‘सीईटी’ बंधनकारक असणार आहे. ८ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येईल. ११ जानेवारी रोजी प्राथमिक यादी, तर १६ जानेवारीला प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात येईल. २८ जानेवारी रोजी दुसरी यादी, तर ३ फेब्रुवारीला तिसरी यादी व स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर विभागाच्या तासिका २८ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत.