‘आरटीई’ प्रवेश नोंदणीसाठी ७ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:40 PM2018-03-05T19:40:39+5:302018-03-05T19:41:10+5:30
शिक्षण विभागाने ‘आरटीई’ अंतर्गत मागास, वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासंबंधी आॅनलाईन नोंदणीकरिता ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
औरंगाबाद : शिक्षण विभागाने ‘आरटीई’ अंतर्गत मागास, वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासंबंधी आॅनलाईन नोंदणीकरिता ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यंदा २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून पालकांना आॅनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता नवीन वेळापत्रकानुसार पालकांना ७ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. जिल्ह्यातील ९ हजार ८४१ आॅनलाईन अर्ज सादर झाले आहेत. शाळांसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली, तर पालकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होती. जुन्या वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी ही पालकांसाठी आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत होती. मुदत संपण्यापूर्वीच शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केली. आॅनलाईन अर्ज भरताना पालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल मॅपनुसार तीन किलोमीटर परिघामध्ये एकही शाळा दिसत नाही. पालकांना येणार्या अडचणी व सातत्याने ‘सर्व्हर हँग’ होत आहे.
१० हजार अर्ज सादर
‘आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात शाळांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. तेव्हा यासाठी जिल्ह्यातील ५६५ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत ९ हजार ८४१ पालकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.