औरंगाबादेत अतिरिक्त पाणी आले, मनपाला जे जमले नाही ते एमजीपीने करून दाखविले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:29 PM2022-05-26T16:29:31+5:302022-05-26T16:30:14+5:30
अतिरिक्त पाणी शहरात आल्यानेच नागरिकांची ओरड कमी
औरंगाबाद : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही एप्रिल अखेरपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठ्यातील अनुभवी अधिकाऱ्यांना यश आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) अधिकाऱ्यांनी हर्सूल आणि जायकवाडी धरणातून प्रत्येकी पाच एमएलडी आणि रोजाबाग येथून एक एमएलडी पाणी वाढवून पाणीपुरवठा सुरळीत केला. मनपा अधिकाऱ्यांना जे जमले नाही, ते एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले, अशी कबुली बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांसह एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांच्यावर जबाबदारी सोपविली. एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी हर्सूल तलावातून नियमित होणारे साडेचार ते पाच एमएलडी पाण्यात वाढ करण्याचे सुचविले. त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे ५ एमएलडी पाणी वाढणार आहे. ही उपाययोजना दीर्घकालीन आहे. रोजाबाग येथील नहर-ए-अंबरची लाईन सुरू केल्याने त्यातून १ एमएलडी पाणी वाढविण्यात आले. जायकवाडी येथे ३५० एचपीचा पंप व फारोळा येथील ३५० एचपीचा पंप सुरू केला. नवीन ट्रान्सफाॅर्मर कार्यान्वित करून २४ तास पंप सुरू ठेवत ५ एमएलडी पाणी वाढविले.
शहरात ११ एमएलडी अतिरिक्त पाणी येऊ लागले. एमआयडीसीने ३ एमएलडी पाणी देण्यास सुरुवात केली. एन-१ येथून ६१ टँकरच्या २८५ फेऱ्या दररोज होत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात सहाव्या दिवशी म्हणजेच समान पाणीपुरवठा होत आहे. प्रत्येक झोनमध्ये पालक अधिकारी नेमून पाईपलाईनची गळती शोधून दुरुस्तीचे काम करण्यात आले. शहराचा पाणीपुरवठा सांभाळणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्यात वाढ करण्याचे जमले नाही ते एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी करून दाखविले असे प्रशासकांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
मनपा अधिकाऱ्यांची नकारात्मता
पाणीपुरवठ्यात १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगला अनुभव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहराला वेगवेगळ्या पद्धतीने दिलासा देता येऊ शकतो. मात्र, पाणीपुरवठ्यातील अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता याच्या आड येत होती. कोणतीही नवीन गोष्ट करायची तर त्याला फाटे फोडण्याचे काम अधिकाऱ्यांकडून करण्यात येते.