महापालिकेत उधळपट्टी, चार तासांच्या कार्यक्रमाचे बिल २८ लाख!
By मुजीब देवणीकर | Published: July 10, 2024 07:29 PM2024-07-10T19:29:02+5:302024-07-10T19:29:44+5:30
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले जातात.
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे आर्थिक खर्चावर कोणाचेच अंकुश राहिलेले नाही. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. १७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त क्रांती चौकात गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एका व्हिडीओचे तब्बल ६२ हजार रुपये मोजण्यात आले. सोशल मीडिया मार्केटिंगसाठी २ लाख ८९ हजार रुपये खर्च झाला आहे. एकूणच चार तासांच्या कार्यक्रमाचे महापालिकेने एकूण २८ लाख रुपये मोजल्याचे समोर आले आहे.
अवधूत गुप्ते यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त चार तासांच्या कार्यक्रमाचे वेगवेगळे व्हिडीओ तयार करण्यात आले. त्याचे जीएसटीसह तब्बल ९ लाख ९४ हजार ७४८ रुपये बिल देण्यात आले. विशेष म्हणजे, अव्वाच्या सव्वा बिल महापालिकेने तातडीने अदाही केले. या बिलात एका व्हिडीओचे जीएसटीसह तब्बल ६२ हजार रुपये आकारण्यात आले आहेत. सोशल मीडिया सेटअप, सोशल मीडिया मार्केटिंग अशा नावाखाली बिले महापालिकेने मोजले आहेत. महापालिकेने लाइम लाईट करेक्शन या एजन्सीला डोळे झाकून बिल देऊन टाकले, असे सूत्रांनी सांगितले.
या कार्यक्रमावर तब्बल २८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवासोबतच शहरात मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत देखील प्रसिद्धीवर सुमारे ३७ लाखांचा खर्च करण्यात आला. हा खर्च शासनाने मनपाला दिलेल्या ४० कोटींच्या निधीतून मिळावा, अशी माहिती कार्यालयाची मागणी आहे; पण ही फाइल मनपाने तूर्त बाजूला ठेवली आहे. दरम्यान, यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले की, हा विषय जनसंपर्क विभागाशी संबधित आहे. जनसंपर्क विभागाकडून माहिती घेऊन अधिक तपशील दिला जाईल.
व्हिडीओवर सर्वाधिक भर
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले जातात. त्यासाठी ‘फिरस्ता मीडिया’ या एजन्सीला लाखो रुपयांची बिले दिली जात आहेत. एका व्हिडीओला ३० ते ३५ हजार रुपये मोजले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.