‘दख्खनी’ मातीची मिजासच निराळी!
By Admin | Published: December 29, 2014 01:06 AM2014-12-29T01:06:06+5:302014-12-29T01:07:26+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही.
औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही. उर्दू अदबच्या दुनियेत दख्खनी मातीचा उल्लेख नसेल तर उर्दू साहित्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असा सूर आज येथे आयोजित एका परिसंवादात मान्यवरांनी आळवला.
आमखास मैदानावर सुरू असलेल्या ‘उर्दू किताब मेला’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये उर्दू साहित्य अकादमीतर्फे ‘मराठवाडा में उर्दू अदब, सिम्त व रफ्तार’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले
होते.
यावेळी व्यासपीठावर दिल्ली विद्यापीठातील निवृत्त उर्दू विभागप्रमुख डॉ.अतीक-उल्ला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इरतेकाज अफजल, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संचालक डॉ. खाजा मोहंमद इकरामोद्दीन, शारेख नक्षबंदी यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. इरतेकाज अफजल यांनी मराठवाड्यातील उर्दू साहित्य, संस्कृतीचा धावता आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतरही या मातीमधील अनेक गावांमध्ये रेल्वे जात नाही. जिथे जाते तिथे थांबत नाही ही शोकांतिका असली तरी लेखकासाठी हा विषय आहे.
मैं चरागों को रौषणी दुंगा,
तुम हवाओं के कान भर देना...
असे हलक्या फुलक्या साहित्यापासून वली दकनी, नुरूल हसनैन, शाह सिराज वली, काझी सलीम, अशा अनेक शायर मंडळींचे नाव घेता येईल. त्यांनी उर्दू साहित्याला दिलेले योगदान येणारी पिढी कधीच विसरू शकत नाही. दख्खनच्या कोणत्या प्रदेशात तुम्ही भर उन्हाळ्यात गेल्यावर एक प्रकारचा विशेष सन्नाटा पाहायला मिळतो, अनेक लेखकांनी यावरही भाष्य केलेले आहे.
या मातीत शब्द ठासून भरले आहेत. येथील रस्ते, बाजार, वारा, सण प्रत्येक गोष्ट संस्कृतीतून झळकत असते. हा वारसा जपणे आपले कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीने साहित्य लिहिले नाही तर किमान वाचायला तरी हवे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. इकरामोद्दीन यांनी उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे नमूद केले. आपल्याकडे काही प्रस्ताव असल्यास परिषदेकडे अवश्य पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. परिसंवादात असलम मिर्झा, डॉ. मसरत फिरदोस, डॉ. शरफून निहार, अशरफ जावेद, डॉ. काझी अख्तर सुलताना, डॉ. हमीद उल्ला खान, डॉ. रिजवाना शमीम, डॉ. कीर्ती मालिनी जावळे आदींनी शोधनिबंध सादर केले. सूत्रसंचालन नवीन जे. पी. सईद यांनी केले.