दु:खातून सावरत केले नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 11:28 PM2016-02-18T23:28:48+5:302016-02-18T23:43:17+5:30

हिंगोली : मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा अगोदरच संकल्प केल्यास इतर कुणाला त्याचा फायदा होतो. मागील काही काळात याबाबत चांगलीच जागृती निर्माण झाली.

Eye donation | दु:खातून सावरत केले नेत्रदान

दु:खातून सावरत केले नेत्रदान

googlenewsNext

हिंगोली : मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा अगोदरच संकल्प केल्यास इतर कुणाला त्याचा फायदा होतो. मागील काही काळात याबाबत चांगलीच जागृती निर्माण झाली. परंतु तरीही आळसापायी अवयवदानाचा फॉर्म भरुन देण्याचे राहूनच जाते. परंतु हिंगोलीतील हनुमाननगर भागातील येरावर कुटुंबियांनी अगदी शेवटच्या क्षणी पुरुषोत्तम नागनाथ येरावार यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण केला.
येरावार एस. टी. वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत होते. ९ वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड होती. पुरुषोत्तम येरावार यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. त्यांना रुग्णालयातून घरी परत नेण्यात आले. दरम्यान, गॅलेक्सी सेवाभावी संस्थेच्या काही सदस्यांनी येरावार कुटुंबियांची भेट घेवून पुरुषोत्तम यांच्या नेत्रदानाचे आवाहन केले. कुटुंबियांनीही त्याला होकार दिला. चांगल्या कामासाठी भावनिकतेचा अडसर असू शकत नाही, हे या कुटुंबियांनी दाखवून दिले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉ. गोपाल कदम यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. कसलाच विलंब न करता डॉ. अपगीरे, केशव भरड, अमोल घुगे यांच्या पथकाने काही क्षणात येरावार यांचे नेत्र घेवून जालना येथील गणपती नेत्र रुग्णालयात पाठविले. त्यामुळे कुणालातरी दृष्टी प्राप्त होणार आहे.

Web Title: Eye donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.