नेत्र शस्त्रक्रियेने मानवी जीवन सुंदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:14 AM2017-12-05T00:14:21+5:302017-12-05T00:14:26+5:30
आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभाग आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबईचे नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर, नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रसाद म्हणाले, आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. परंतु या तंत्रज्ञानाला आपल्या अनुभवाची जोड दिली पाहिजे. याचा सगळा फायदा रुग्णांना होईल. डोळे अतिशय नाजूक भाग आहे. यामध्ये किंचितशी चूकसुद्धा रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. व्यक्तीचा चष्मा घालविणाºया शस्त्रक्रियांनी डोळ्यांच्या उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. शशी कपूर यांनीही विविध शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शहरातील १२० तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. सुनयना मलिक, डॉ. राजू मुंदडा व डॉ. धनंजय मावरे यांनी विशेष प्रयत्न केले.