‘अॅडव्हान्स लिडरशिप’साठी ब्रिटीश कौन्सिलच्या नजरेत ‘गौरव’ देशात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 07:21 PM2018-10-20T19:21:43+5:302018-10-20T19:24:42+5:30
देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : जगाला नवीन काही देण्याची जिद्द, संशोधकवृत्ती, संवाद कौशल्य व हाती घेतलेले काम तडीस नेण्याची चिकाटी असणाºया विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली येथे ब्रिटीश कौन्सिलने देशभरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. अतिशय चिकित्सक पद्धतीने घेतलेल्या सादरीकरण व संवाद कौशल्य चाचणीतून ब्रिटीश कौन्सिलच्या ‘ज्युरी’ने औरंगाबादच्या गौरव सोमवंशीला हेरले. विविध राज्यांतून सहभागी ४५० विद्यार्थ्यांपैकी गौरव हा प्रथम ठरला असून त्याच्यासह देशातील चार विद्यार्थ्यांना मंगळवारपासून केंब्रीज विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
केंब्रीज विद्यापीठाने ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ हा उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये जगभरातील नवसंशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने नावीण्यपूर्ण शोध लावला असेल, पण जगासमोर आणण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नसेल. अथवा केवळ अत्याधुनिक प्रयोगशाळेअभावी किंवा पैशाअभावी त्या संशोधनाचे पैलू तो विकसित करण्यास असमर्थ ठरला असेल, अशा नवसंशोधक विद्यार्थ्यांना सर्वार्थाने बळ देण्यासाठी केंब्रीज विद्यापीठात दहा दिवसांचा ‘अॅडव्हान्स लिडरशिप’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतासह १० ते १५ देशांतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या गौरवची या उपक्रमासाठी निवड झाली. गौरव हा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तत्कालीन ‘कान, नाक, घसा’ तज्ज्ञ डॉ. ज्ञानदीप सोमवंशी यांचे चिरंजीव आहेत. गौरवचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतच पूर्ण झाले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने ‘संगणक अभियांत्रिकी’ची पदवी घेतल्यानंतर लखनौ येथे त्याने व्यवस्थापनशास्त्राचे पदव्युत्तर (आयआयएम) शिक्षण घेतले.
यासंदर्भात गौरवने सांगितले की, केंब्रीज विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘अॅडव्हान्स लिडरशिप’साठी ब्रिटीश कौन्सिलने दिल्ली येथे मुलाखत व सादरीकरणाची स्पर्धा ठेवली होती. त्याची माहिती सोशल मिडियामधून मिळाली. त्यासाठी अर्ज केला. विविध राज्यांतून जवळपास ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वांना पाच- पाच मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोत्कृष्ट सादरीकरण, उत्कृष्ट संवाद कौशल्य आणि नावीण्यपूर्ण संशोधनासाठी देशातून अवघ्या चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ‘ब्लॉकचैन टेक्नोलॉजी’मध्ये केलेले संशोधन हा माझा विषय होता, असे तो म्हणाला.