सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे; मराठवाड्यातील पाच आमदारांची वाढली धाकधूक
By स. सो. खंडाळकर | Published: May 11, 2023 11:47 AM2023-05-11T11:47:22+5:302023-05-11T11:49:15+5:30
सत्तासंघर्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ती आता संपत आहे. हा निकाल नेमका काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.
छत्रपती संभाजीनगर : सत्तासंघर्षाच्या निकालात मराठवाड्यातील पाच आमदारांवर टांगती तलवार असल्याने ते अस्वस्थ आहेत. तसेच पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या सुरत, गुवाहाटी व गोवा दौऱ्यात सहभागी होते. त्यांनाही आपल्या भवितव्याची चिंता भेडसावते आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. त्याला जबरदस्त तडा या घटनेने बसला होता. एकनाथ शिंदे यांच्या या उठावात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व संजय शिरसाट अग्रभागी होते. शिरसाट यांनी तर गुुवाहाटीवरूनच उध्दव ठाकरे यांना आव्हान देणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. भुमरे व सत्तार यांच्याही प्रतिक्रिया तिखटच होत्या. विशेषत: उध्दव ठाकरे यांच्याबद्दलच अधिक तक्रारी होत्या. शिवाय संजय राऊत हे आम्हाला उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते, असा आरोपही त्यांनी केला होता.
धाराशिवचे तानाजी सावंत यांचाही अपात्र होऊ शकणाऱ्या आमदारांच्या यादीत समावेश आहे. संभाव्य उठावासाठी दीडशे बैठका झाल्या होत्या व या बैठकांना देवेंद्र फडणवीस हे वेशांतर करून येत असत, असा गौप्यस्फोट करून त्यांनी अलीकडेच खळबळ उडवून दिली होती. छत्रपती संभाजीनगर (मध्य)चे आ. प्रदीप जैस्वाल व वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरनारे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार नसली तरी ते गुवाहाटीला गेले होते. तसेच मराठवाड्यातून हिंगोलीचे वादग्रस्त आ. संतोष बांगर, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले व नांदेडचे बालाजी कल्याणकर हेही गुवाहाटीला गेले होते. यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार नाही.
सारेच आमदार जोमात
सत्तासंघर्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. ती आता संपत आहे. हा निकाल नेमका काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्यांपैकी आ. संजय शिरसाट यांची मंत्री होण्याची अतीव इच्छा मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही. ते सध्या शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण, हल्ली त्यांची गाडी सुसाट आहे. संदीपान भुमरे यांच्या टीकेलाही धार आली आहे.