समृध्दीच्या बछडयांचे डोळे उघडले, लवकरच नामकरण सोहळा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:46+5:302021-01-13T04:05:46+5:30
औरंगाबाद : सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील 'समृद्धी' या वाघिणीने २५ डिसेंबर २०२० रोजी पाच बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर तब्बल १५ ...
औरंगाबाद : सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील 'समृद्धी' या वाघिणीने २५ डिसेंबर २०२० रोजी पाच बछड्यांना जन्म दिला. त्यानंतर तब्बल १५ दिवसांनंतर या बछडयांचे डोळे उघडले असून, ते सध्या पिंजऱ्यातच वावरत आहेत. सर्व बछड्यांची प्रकृती अत्यंत चांगली आणि समाधानकारक आहे. बछडयांवर सहा आठवडयांपर्यंत लक्ष ठेवले जाणार असल्याचे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या सिद्धार्थमधील प्राणीसंग्रहालयात सर्वाधिक नऊ वाघ आहेत. त्यात आणखी पाच वाघांची भर पडली आहे. २५ डिसेंबर रोजी सिद्धार्थ-समृद्धी यांच्यापासून पाच बछड्यांचा जन्म झाला. पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. सीसीटीव्हीमार्फत वॉच ठेवला जात असून वाघीण व बछड्यांच्या देखभालीसाठी २४ तास केअरटेकर नियुक्त करण्यात आला आहे. तब्बल १५ दिवसांनंतर या पाच बछडयांचे डोळे उघडले आहेत. त्यामुळे हे बछडे समृद्धीच्या पिंजऱ्यातच मौजमस्ती करीत आहेत. समृध्दी वाघिणीची करडी नजर या बछडयांवर आहे. अद्याप त्यांच्या जवळपास कोणालाही प्रवेश करू दिलेला नाही. केअरटेकर देखील बाहेरूनच वाघिणीसह बछडयांवर लक्ष ठेवत असल्याचे प्राणीसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.