ट्रक-बसची समोरासमोर टक्कर
By Admin | Published: May 14, 2017 12:42 AM2017-05-14T00:42:03+5:302017-05-14T00:43:34+5:30
नळदुर्ग : ट्रक-बसची समोरासमोर धडक होऊन २५ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महार्गावरील शिरगापूर शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नळदुर्ग : ट्रक-बसची समोरासमोर धडक होऊन २५ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महार्गावरील शिरगापूर (ता. तुळजापूर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड (पुणे) आगाराची बस (क्र. एमएच-१४/बीटी-०५१२) ही शुक्रवारी सायंकाळी मुरूमकडे जात होती. महामार्गावरील बाभळगावच्या पुलाच्या पुढे नवीन रस्त्यावरून जुन्या रस्त्यावर वळण घेत असताना हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकची (क्र. टीएस-०५/व्हीए-२०८२) या बसला समोरून जोराची धडक बसली. या अपघातात बसचालक राधाकिसन विठ्ठल गुजर (वय ५०, रा. राखेवाडी, पुणे) यांचे निकामी झाले. तसेच वाहक प्रवीण चंद्रसेन सुरवसे (वय ४०), प्रवासी राम धमाजी राठोड, बेबाबाई वसंता राठोड, झिमाबाई राम राठोड, चंदाबाई किसन राठोड, किसन परशुराम राठोड, बाबू थावरू राठोड, राणुबाई बलभीम राठोड (सर्व रा. खुदावाडी, ता. तुळजापूर), प्रकाश सुधाकर साळुंके, दिलीप राम सुरवसे, गणेश दत्ता माने (सर्व रा. जळकोट, ता. तुळजापूर), अण्णाराव सिद्राम बिराजदार, महानंदा अण्णाराव बिराजदार (रा. उमरगा) यांच्यासह ट्रक चालक सईद यादगिरी (रा. तुळशीनगर, ता. नलगोंडा, तेलंगणा) हे जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. यातील राधाकिसन गुजर, राम राठोड, राणुबाई राठोड आणि गणेश माने यांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमधील इतरही प्रवासी किरकोळ जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी वाहक प्रवीण सुरवसे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी, ईटकळ दूरक्षेत्रचे हेकॉ आर. जी. सातपुते, कॉन्स्टेबल डी. यु. उंबरे, एन. एच. वाघमोडे, महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पाच सहकारी घटनास्थळी धावले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.