फेसबुक अकाउंट हॅक करून घातला जातोय गंडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:39+5:302021-03-04T04:06:39+5:30
कन्नड : मूळ अकाउंट हॅक करून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले जाते. त्या बनावट फेसबुक अकाउंटवरून फेसबुक मित्रांना भावनिक ...
कन्नड : मूळ अकाउंट हॅक करून बनावट फेसबुक अकाउंट तयार केले जाते. त्या बनावट फेसबुक अकाउंटवरून फेसबुक मित्रांना भावनिक आवाहन करून मदत करण्यासाठी फोन पे चा नंबर देऊन त्यावर रक्कम पाठविण्याचे आवाहन केले जाते. या आवाहनाला बळी पडून दिलेल्या फोन पे च्या नंबरवर काही फेसबुक मित्रांनी रक्कम ही पाठवल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. असाच धक्कादायक प्रकार घडल्यानंतर फेसबुकच्या मूळ अकाउंटधारकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तशी तक्रार दिली. तर बनावट अकाउंट बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली.
कन्नड पंचायत समितीचे लिपिक संतोष पडघन यांना त्यांचे मित्र व नातेवाईकांचे फोन आले. कोण आजारी आहे? किती पैसे लागणार आहेत? फेसबुकवर पोस्ट टाकण्याऐवजी फोन करायचा असे सल्लेही काहींनी दिल्यावर काहीतरी गडबड झाल्याचा संशय आल्याने त्यांनी अकाउंट तपासले. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या नावे फेसबुकवर नवीन अकाउंट होते व त्यावर दवाखान्यात मुलीवर उपचार सुरू असल्याचा फोटो टाकून मित्राची मुलगी आजारी आहे? अशी पोस्ट टाकून फोन पे करण्यासाठी एक नंबर देण्यात आला. दोन दिवसात पैसे परत करतो अशीही सोबत पोस्ट टाकली होती.
विशेष म्हणजे या अकाउंटवर हॅकर चॅटींगही करीत होता. त्यामुळे पडघन यांच्या काही मित्रांनी यथाशक्ती प्रत्येकी १ हजार प्रमाणे ७ ते ८ हजार रुपये टाकले होते. अकाउंट हॅक झाल्याचे
लक्षात आल्यावर त्यांनी मूळ अकाउंटवर "माझे अकाउंट हॅक झाले आहे, कुणीही पैसे पाठवू नये" अशी पोस्ट टाकून शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. असाच प्रकार ग्रामसेवक अरुण गोर्डे यांच्या बाबतीतही घडला. पैशांची एवढी काय निकड भासली असे मित्रांनी फोन करून त्यांना विचारल्यानंतर त्यांना काहीच लक्षात येईना. तेव्हा तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे मित्रांनी सांगितल्याने त्यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सतर्क रहा, पोलिसांचे आवाहन
फेसबुक अकाउंटवर करण्यात आलेल्या आवाहनाबाबत खात्री करा. संपर्क करून संबंधितांचा फोन पे, गुगल पे अथवा बँक खात्याची खात्री करूनच रक्कम पाठवावी. सोशल साईडची सेंटींग करून फक्त ओळखीच्या लोकांसाठी ते खुले ठेवावे, असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. रामेश्वर रेंगे यांनी केले.