माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले; छत्रपती संभाजीनगरात ३२ प्रभाग, १२६ वॉर्ड
By मुजीब देवणीकर | Published: March 2, 2024 02:39 PM2024-03-02T14:39:24+5:302024-03-02T14:40:01+5:30
महायुतीच्या या निर्णयामुळे काही वर्षांपासून मनपा निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मुंबई वगळता राज्यातील अन्य महापालिकांमध्ये चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला १२६ वॉर्डानुसार चार वॉर्डांचे ३० प्रभाग करावे लागतील. शेवटच्या सहा वॉर्डांसाठी दोन प्रभाग ३ नुसार करावे लागतील. महायुतीच्या या निर्णयामुळे काही वर्षांपासून मनपा निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे चेहरे खुलले आहेत. लवकरच निवडणुका होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २० एप्रिल २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपला. चार वर्षांपासून प्रशासक कारभार पाहत आहेत. महापालिकेत कारभारी नाहीत. १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही निवडणुका १९८८ मध्ये घेतल्या होत्या. सहा वर्षे प्रशासक कामकाज पाहत होते. १९८८ नंतर प्रथमच महापालिकेत प्रशासक नेमण्यात आले आहेत. मागील चार वर्षात राज्य शासनाने एकदा जुन्या वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तीन वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तर महापालिकेने प्रक्रियाही पूर्ण केली. सूचना हरकतीपर्यंत प्रक्रिया करून ठेवली. मात्र, निवडणुकांची घोषणा झालीच नाही. गुरुवारी राज्य शासनाने महापालिका निवडणुकांच्या मुद्याला स्पर्श करीत ४ वॉर्डांचा प्रभाग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे इच्छुकांना निवडणुकीच्या आशेचा किरण दिसून येतोय.
दोनदा विरस
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी कोरोना संसर्ग काळात मोठ्या प्रमाणात किट वाटप, नागरिकांची मदत करण्याचे काम केले. निवडणुका लवकरच घेण्यात येतील, अशी घोषणा दोन वेळेस झाली. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे इच्छुकांचा हिरमोड झाला. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा मावळला होता. मोजके इच्छुकच सध्या आपल्या वॉर्डांमध्ये सक्रिय आहेत.
काय म्हणाले अधिकारी ?
महापालिकेत निवडणूक विभागाचे कामकाज पाहणारे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला हे खरे आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. चार वॉर्डांच्या प्रभागात लोकसंख्येचे निकष पाहिले जातात. मनपा हद्दीत १२६ वॉर्ड आहेत. ४ वॉर्डच्या नियमाने ३० प्रभाग आपल्याकडे होतील. शेवटच्या सहा वॉर्डांसाठी ३ वॉर्डांचे दोन प्रभाग करावे लागतील, असा अंदाज आहे. प्रभागांची संख्या कमी जास्त होऊ शकते. आयोगाकडून सूचना आल्यावर अधिक बोलणे सोयीस्कर होईल.