फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 06:17 PM2022-03-23T18:17:44+5:302022-03-23T18:18:18+5:30
जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले.
औरंगाबाद : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब ही उपाधी देऊन त्यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य अक्षम्य असून फडणवीस हे मियाँ देवेंद्र असल्याची टीका करीत शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढविला.
फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांचे इफ्तार पार्टीमधील फोटो दाखवित फडणवीस हे दोन वर्षांपूर्वीच मियाँ झाले आहेत, असा टोला लगावत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याचे ‘पिल्लू’ भाजपनेच सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.
खा. राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी मंगळवारी औरंगाबादेत असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.
जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. असा आरोप खा.राऊत यांनी केला. निधी वाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर, खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याबाबत खा. राऊतांनी सर्वांना समसमान निधी वाटप करण्यात आला आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले.
एमआयएमशी जवळीक नाही
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत चलबिचल वाढावी, यासाठी एमआयएमसोबत आघाडी होईल, असे ‘पिल्लू’ भाजपने सोडण्याचे षडयंत्र रचले. मात्र शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही, त्या पक्षाने भाजपचे बटीक रहावे. खा.इम्तियाज जलील नाटक करीत असल्याचा टोला खा.राऊत यांनी लगावला.
शेंडी, जाणव्यातील आमचे हिंदुत्व नाही
शिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. असे स्पष्ट करीत खा. राऊत म्हणाले, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.