दोन परीक्षांमध्ये अपयश अन् नंतर सलग ३ परीक्षांमध्ये यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 01:05 PM2024-04-09T13:05:43+5:302024-04-09T13:06:33+5:30
जानेफळच्या शारदाची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी
- विजय जाधव
शिऊर : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सलग ३ परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची किमया वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीने साधली आहे.
जानेफळ येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीचे शालेय शिक्षण गावातच झाले. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण वैजापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असत. १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्याने शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. तेथेच शारदाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या गुणाने बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळाल्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा दिली; परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही खचून न जाता बॅंकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली. बॅंकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली. अशात घरातील मंडळींनी तिच्यासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली. घरच्यांच्या मनाप्रमाणे स्थळ आले आणि त्यांनी शारदाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. शारदानेही त्यास होकार दिला.
हळदीला पहिलाच निकाल, आनंदात भर...
शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाल्याची बातमी आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी बॅंकिंगच्या आयबीपीएस परीक्षेतची ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. त्यामुळे शारदाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. लागोपाठ तीन परीक्षांमध्ये शारदाने यश संपादन केल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी शारदाचे काैतुक केले. शिवाय गावातही शारदाच्या यशाचीच चर्चा सुरू झाली.
बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न
याबाबत बोलताना शारदा म्हणाली, आईवडील, आजी-आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. बालपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे अपयश आल्याने खचून न जाता परीक्षेची तयारी चालू ठेवली. त्यानंतर सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळाले, याचे समाधान वाटते.