संशयामुळे विवाहिता अडकल्या छळाच्या संकटाच्या फेऱ्यात
By Admin | Published: July 14, 2014 11:42 PM2014-07-14T23:42:33+5:302014-07-15T00:52:01+5:30
लातूर : पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या विवाहितांच्या छळाला विविध कारणे असली तरी त्या पाठोपाठ मुलीच होणे, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा
लातूर : पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या विवाहितांच्या छळाला विविध कारणे असली तरी त्या पाठोपाठ मुलीच होणे, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी लावला जाणारा तगादा ही सर्वाधिक आहे. अशा गुन्ह्यांमध्ये कित्येकदा पतीसोबतच कुटुंबातील इतरांचाही नामोल्लेख केला जातो. प्रत्यक्ष छळाशी केवळ पतीचा संबंध असताना इतरांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कौटुंबिक कलहाच्या अशा प्रकरणांमध्ये समूपदेशन करण्यासाठी पोलिसांमार्फत महिला तक्रार निवारण केंद्र स्वतंत्रपणे चालविले जाते. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा दंडिमे या केंद्राचे काम पाहत आहेत. या समूपदेशन केंद्रातील यंत्रणेशी चर्चा केली असता काही गंभीरबाबी पुढे आल्या. विभक्त कुुटुंब, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन, माहेरच्यांशी वाढता संपर्क, माहेरच्या मंडळींचा अवाजवी हस्तक्षेप, पैशाची चणचण आदी कारणे पुढे आली आहेत. या कारणांमुळे पती-पत्नींमध्ये खटके उडणे, मारहाण, माहेरी निघून जाणे, नातेवाईकांकडून नातेसंबंधांचा कोणताही विचार न करता पोलिसातील तक्रारीसाठी अथवा थेट न्यायालयीन खटल्यासाठी प्रोत्साहित करणे हे प्रकार घडत आहे.
माहेरच्यांच्या पाठबळामुळे आणि आर्थिक संपन्नतेमुळे अनेकदा मुली इच्छा नसूनही (केवळ आई म्हणते म्हणून) पती व सासरच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल करीत असल्याचे आढळून आले. संसार तुटू नये म्हणून पोलीस नरमाईची भूमिका घेतात, दोनही पक्षाला समजाविण्याचा प्रयत्न करतात. परंतु अनेकदा पोलिसांवरच ‘आरोपीला मॅनेज झाले’ असा आरोप करून त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात.
समूपदेशन केंद्रात अनेक प्रकरणात तडजोड होते, त्यांची चूक त्यांना कळते. कित्येकदा तर पती-पत्नीचा वादच नसतो. त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचेही कान भरुन तो उभा केला असल्याचे जाणवते. पोलीस ठाण्यापर्यंत गेलेली कौटुंबिक छळाची कित्येक प्रकरणे समूपदेशनाने मिटली आहेत. त्यांचे संसार तुटण्यापासून वाचले, आजही ते गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र काही प्रकरणात पती-पत्नीकडून ताठर भूमिका घेतली जात असल्याने गुन्हे दाखल केले जातात. त्यातूनच हा आकडा वर्षाकाठी ३०० च्या घरात पोहोचतो. दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण कमी आहे. कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झालेले अनेक कुटुंब बर्बाद झाल्याचीही उदाहरणे आहेत. (प्रतिनिधी)
पती-पत्नीमधील भांडणाचे कारण असलेले गैरसमज, हेवेदावे दूर करण्यासाठी समूपदेशन केंद्र हा प्लॅटफॉर्म आहे. छळाच्या घटनांमागे दारूचे व्यसन, चारित्र्यावर संशय घेणे ही सर्वाधिक कारणे आढळून आली आहे. याशिवाय माहेरहून हुंड्याची रक्कम न आणल्याने होणारी मारहाण, काही प्रकरणात माहेरच्या मंडळींचा हस्तक्षेप याबाबीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. ४९८ (अ) कलमांतर्गत छळाचा गुन्हा दाखल होणे ही समूपदेशनानंतरची पायरी आहे.
- वर्षा दंडिमे,
केंद्र प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक,
महिला तक्रार निवारण केंद्र, लातूऱ
महिलांवरील वाढते अत्याचार थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक कायद्यांची अंमलबजावणी केली जात आहे. न्यायालयाचा निकालाचे स्वागत केले पाहिजे़ अनेकदा पोलिसांत तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जातो़ त्यामुळे महिला हतबल होतात़ त्यातूनच महिलांवर दबाव आणला जातो आणि त्यामुळे महिलांची मानसिकता बदलते़
- आशा भिसे, सदस्या, राज्य महिला आयोग, लातूऱ
न्यायालयाचा निकाल योग्य आहे़ महिलांच्या छळप्रकरणी कायद्याच्या तरतुदीनुसार शिक्षा होते, हे जरी सत्य असले तरी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर जामिनावर मुक्तता होते़ ही मुक्तता झाल्याने घरी आल्यानंतर पुन्हा तक्रारदार विवाहिता आणि घरच्या मंडळींमध्ये तेढ निर्माण होतो़ त्यामुळे जामिनावर सुटका होऊ नये़ तसेच कायद्याची भिती बसावी म्हणून आणखीन कडक कायदा व्हायला हवा़
- उषा कांबळे, सदस्या, राज्य महिला आयोग, लातूऱ
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश स्वागतार्ह आहे. तक्रार महिला आणि आरोपी या दोन्हींच्या बाजू पडताळून पाहिल्या पाहिजे़ पोलिसांनी गांभीर्याने तपास नाही केल्यास अत्याचारग्रस्त महिलेस न्याय मिळणार नाही़ तसेच योग्यवेळी दक्षता कमिटीवरील महिलांचा सल्लाही घेतला पाहिजे़
- ज्योती पवार, जिल्हाध्यक्षा, महिला काँग्रेस, लातूऱ
महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला जातो. पोलिसांनी केवळ वरवरची चौकशी न करता दोन्ही बाजूंची चौकशी करायला हवी़ सखोल चौकशी झाल्यास नेमके कारण समजू शकेल़
- अॅड़ स्मिता परचूरे, अध्यक्षा, स्वयंसिध्दा महिला मंडळ, लातूर
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री सदैव असुरक्षित राहिली आहे. सासरी कितीही अन्याय झाला तरी तो सहन कर, हा संस्कार तिच्यावर झालेला असतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे छळ करणाऱ्यांना लगाम बसणार नाही, अशी भिती वाटते़ अनेकदा कायद्याची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविली जात नाही़ त्यामुळे कायदे समाजाभिमूख होण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबविली पाहिजे़ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शोषित महिलांना त्याचा लाभ होईल़
-माधव बावगे,
राज्य प्रधान सचिव, अंनिस, लातूऱ
न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. कुठलाही आरोप झाल्यानंतर त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. काही वेळा काही विघ्नसंतोषी महिलांना चुकीचे मार्गदर्शन करुन ४९८ अ कलमाखाली तक्रार द्यायला सांगितली जाते़ ही मानसिकता सर्वांनी बदलणे गरजेचे आहे़ गुन्हा दाखल करतेवेळी पोलिसांनी अगोदर पती व त्याच्या कुटुंबात राहणाऱ्यांवर केला पाहिजे़ त्यानंतर तक्रारीत नोंदविण्यात आलेल्या नावांची चौकशी करुन त्यात तथ्य आढळून आल्यास गुन्हा दाखल करावा़ त्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होईल.
- अॅड़ उदय गवारे, लातूऱ
४९८ अ या कलमाचा गैरवापर होत आहे, असे वाटत नाही़ कारण बहुतांशी ठिकाणी विवाहितांचा छळ हा पैशासाठी होतो़ आर्थिक कमजोर असलेल्या महिला या कलमाचा गैरवापर करणार नाहीत़ अत्याचाराचे तथ्य समोर आणण्यासाठी चौकशी समिती नेमणे आवश्यक आहे़ महिला आयोगाच्या सदस्यांनीही लक्ष घातले पाहिजे़
-डॉ़ गितांजली पाटील, जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला़, लातूऱ
हुंडाविरोधी कायदा : संमिश्र प्रतिक्रिया
हुंडाविरोधी कायद्याचा होत असलेल्या दुरुपयोगामुळे सासरच्या मंडळींकडील निरपराधांनाही नामुष्कीचा सामना करावा लागतो. विवाहितेच्या तक्रारीनंतर लगेचच सासरच्या मंडळीला कायदेशीर तरतुदीनुसार अटक करू नका, चौकशी करून आरोपात तथ्य असेल तरच त्यांना अटक करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.के. प्रसाद आणि न्यायमूर्ती पी.सी. घोसे यांच्या न्यायपीठाने दिले आहे. या निर्णयावर जिल्ह्यातील विधी व सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रिया...