स्वातंत्र्यसैनिकांचे बोगस प्रमाणपत्र; दोघे बडतर्फ तर ३५ जणांच्या शासकीय सेवेवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:54 AM2019-05-10T11:54:57+5:302019-05-10T11:56:08+5:30
उर्वरित ३५ कर्मचारी जिल्ह्याबाहेर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले.
औरंगाबाद : स्वातंत्र्यसैनिकांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविलेल्या जिल्हा प्रशासनातील मंडळ अधिकारी गणेश देवकाते आणि अव्वल कारकून कैलास थोरात यांना बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. उर्वरित ३५ कर्मचारी जिल्ह्याबाहेर असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक नामनिर्देशित पाल्य म्हणून सरकारी सेवेत आलेल्यांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांशी कुठलेही नातेसंबंध नसताना अनेकांनी बनावट नामनिर्देशनपत्र तयार करून घेतले. यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी तक्रारदार पी.एन. मोने यांनी केली होती. त्यानुसार १८ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती. पुढे २५ फेबु्रवारी २०१९ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सहा आठवड्यांत याप्रकरणी निर्णय घेऊन त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची मुदत होती. त्यानुसार दोघांना बडतर्फ करण्यात आले असून उर्वरित ३५ जणांवर कारवाईचे पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
टांगती तलवार असलेले ३५ कर्मचारी
नीलेश यार्दी (जि.प. पुणे), नितीन राठोड (आरोग्य विभाग, नाशिक), राजेंद्र सोळंके (पोलीस प्रशासन, जालना), अरविंद शेजूळ (पीडब्ल्यूडी, ठाणे), कल्याण सोळुंके(तंत्रशिक्षण विभाग, औरंगाबाद), प्रभाकर बारबैले (आरोग्य विभाग, औरंगाबाद), रावसाहेब गायकवाड, (भूमी अभिलेख, औरंगाबाद), बाबूराव जाधव (राज्य भाषा विभाग, औरंगाबाद), संजय तरटे (आरोग्य सेवा, औरंगाबाद), अशोक चंदनकर (जि.प. जालना), भारत ओलेकर (लेखापरीक्षा विभाग, बुलडाणा), भरत तवार (वन विभाग, औरंगाबाद), नामदेव मेटे (आरोग्य सेवा, औरंगाबाद), भाऊसाहेब वहाटुळे (शासकीय विद्यानिकेतन, औरंगाबाद), गणेश साळुंके (ग्रामीण आरोग्य सेवा, पिशोर), केशवराव डकले (जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद), दिलीप साबळे (कृषी आयुक्तालय, पुणे), किशोर भोलाने (आरोग्य सेवा, औरंगाबाद), दत्तू तरटे (भूमी अभिलेख, औरंगाबाद), अशोक पवार (कृषी विभाग, औरंगाबाद), प्रदीप जाधव (मत्स्य व्यवसाय आयुक्तालय, मुंबई), रामदास म्हस्के (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), गुलाब चव्हाण (वन विभाग, औरंगाबाद), दिलीप कदम (ग्रामीण आरोग्य सेवा, परांडा), विष्णू चव्हाण (पीएफ विभाग, परभणी), रवींद्र व्यवहारे (कृषी विभाग, जळगाव), कल्याण कवडे (जि.प. जालना), सोमनाथ जिवरग (आरोग्य विभाग, औरंगाबाद), विजय काळे (व्यवसाय प्रशिक्षण विभाग, औरंगाबाद), दत्तात्रय सूर्यवंशी (आरोग्य सेवा, वैजापूर), अनिल चव्हाण (आरोग्य सेवा, औरंगाबाद), त्र्यंबक चव्हाण (लेखा विभाग, जालना), प्रल्हाद लोखंडे (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), विजय शेटे (नगररचना, पुणे), रमेश जगताप (लेखापरीक्षक विभाग, औरंगाबाद), जगन्नाथ भानुसे (कृषी विभाग, औरंगाबाद), दिगंबर कळंब (पीडब्ल्यूडी, जालना).
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत
जिल्ह्यातील एकूण ३५ कर्मचारी स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शासकीय विभागांत कार्यरत आहेत. त्या सर्व शासकीय विभागांना पत्र देऊन कारवाई करण्याबाबत सुचविण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांनी दिली.